आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकल्यावर जेव्हा राष्ट्रगीत सुरू होते आणि तिरंगा डोळ्यासमोर उंचावताना दिसतो, तेव्हाचा अनुभव शब्दांत व्यक्त करता येत नाही, तो अनुभव आनंदाश्रूंनीच व्यक्त होतो. आतापर्यंत देशाला अनंत आनंदाचे क्षण देणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रगीताच्या माध्यमातून एकत्र आणावे आणि त्यांच्यामार्फत आजच्या युवा पिढीला चांगला संदेश मिळेल, या संकल्पनेने भारताचा माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णीने नवीन संकल्पना सर्वासमोर आणली आहे. या संकल्पनेला त्याने ‘द स्पोर्ट्स हिरोज’ असे नावही दिले आहे. या नव्या पद्धतीने निर्मिलेल्या राष्ट्रगीताचे सादरीकरण २४ जानेवारीला भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते होणार आहे.
‘‘आजचे तरुण खेळ खेळतात, पण ते फक्त मोबाइल किंवा व्हिडीओ गेम्सवर. मैदानात आजची युवा पिढी उतरताना दिसत नाही. मैदानात खेळण्याचे बरेच फायदे आहे. तुम्ही शारिरीक आणि मानसिकरीत्या तंदुरुस्त राहता. तुम्हाला रणनीती आखण्यासाठी शक्कल लढवावी लागते. एखादा सामना गमावल्यावर पुनरागमन कसे करायचे, हे मैदानात उतरल्याशिवाय कळणार नाही. आजच्या मुलांपुढे चांगले आदर्शवत खेळाडू आहेत, पण त्यांचे अनुकरण ते करताना दिसत नाहीत. युवा पिढीने मैदानात उतरावे आणि खेळाडूंवर आधारित पहिले राष्ट्रगीत बनवावे, हा माझा मुख्य हेतू यामागे आहे,’’ असे निलेशने सांगितले.
या राष्ट्रगीताला राम संपत यांनी संगीत दिले आहे. त्याचबरोबर दिग्दर्शनाची जबाबदारी अभिजीत पानसे यांनी सांभाळली आहे. शासकीय नियमांनुसार ५२ ते ५६ सेकंदांमध्ये हे राष्ट्रगीत बनवण्यात आले असून त्यानंतर आदर्शवत खेळाडू संदेश देणार आहेत.
‘‘ ट्वेन्टी-२० विश्वचषक, रिओ ऑलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या स्पर्धा आगामी काही महिन्यांमध्ये आहेत. त्याचा विचार करून गेल्या ८-९ महिन्यांपासून मी यावर मेहनत घेतली आहे. कुणीही हे राष्ट्रगीत आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेऊ शकते. यासाठी कोणतेही शुल्क नाही. ,’’ असे निलेशने सांगितले.