News Flash

आव्हानांना ठोसा देत साक्षीचे यशाला रिंगण!

दुखापत होईल म्हणून साक्षी गायधनीच्या कुटुबीयांचा बॉक्सिंगला विरोध होता.

|| स्वदेश घाणेकर

दुखापत होईल म्हणून साक्षी गायधनीच्या कुटुबीयांचा बॉक्सिंगला विरोध होता. एक तर मुलगी आणि त्यात बॉक्सिंग खेळताना दुखापत झाली की मग पुढील आयुष्य कसे जाईल, हा विचार इतरांप्रमाणे तिच्या वडिलांच्या मनात त्यावेळी आला. पण प्रशिक्षकांनी सुरक्षेची हमी दिली आणि तिचा प्रवास सुरू झाला. तिनेही राज्य, राष्ट्रीय आणि आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकावून प्रशिक्षकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. नुकत्याच झालेल्या युवा आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या या कन्येने रौप्यपदक पटकावले. त्यामुळे साक्षीच्या पालकांनाच नव्हे, तर नाशिक-पुणे महामार्गाशेजारीच असलेल्या तिच्या पळस गावातील सर्वाना तिचा अभिमान वाटत आहे. तिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन बॉक्सिंगमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी गावातील अनेक मुली उत्सुक आहेत.

नाशिक-पुणे महामार्गानजीक असलेल्या पळस गावाच्या साक्षीने २०१५मध्ये बॉक्सिंग प्रशिक्षणाला सुरुवात केली. दुखापत होईल म्हणून सुरुवातीला साक्षीच्या पालकांचा विरोध होता, परंतु प्रशिक्षक सतीशचंद्र भट यांनी तिच्या पालकांचे मनपरिवर्तन केले. त्याबाबत साक्षी सांगते, ‘‘सतीशचंद्र भट सरांची आणि माझ्या कुटुंबियांची एका कार्यक्रमात भेट झाली. त्यावेळी भट सरांनी मला कोणत्या इयत्तेत आहे, असे विचारले. मी सातवीत आहे, असे सांगताच त्यांना आश्चर्य वाटले. माझी उंची अधिक असल्याने त्यांना सुरुवातीला विश्वस बसला नाही. त्यांनी मला बॉक्सिंग खेळण्याचा सल्ला दिला. मात्र मला दुखापत होईल म्हणून घरच्यांनी विरोध केला. पण सरांनी त्यांना तसे काही होणार नाही, असे पटवून दिले. त्यानंतर माझा बॉक्सिंगचा प्रवास सुरू झाला.’’

बँकॉक येथील युवा आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत ८१ किलो वजनी गटात मिळवलेल्या रौप्यपदकाच्या कामगिरीबाबत साक्षी म्हणाली, ‘‘सुवर्णपदकाने हुलकावणी दिल्याची खंत आहे. मात्र पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदकापर्यंत मारलेली मजल प्रेरणादायी आहे. या पदकाचे मोल भविष्यात पटकावणाऱ्या अन्य पदकांपेक्षा नक्कीच अधिक महत्त्वाचे असेल.’’

आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदार्पणातच पदक मिळाल्याचा आनंद तिच्या बोलण्यातून जाणवत होता. या आनंदाचे महत्त्व पटवून देताना साक्षीला शब्द सुचत नव्हते. ती म्हणाली, ‘‘हरयाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आशियाई स्पर्धेतील सहभाग निश्चित केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पदक जिंकून देण्याचे स्वप्न होते. सुवर्णपदकाने हे स्वप्न पूर्ण झाले असते तर अधिक आनंद झाला असता. मात्र ही माझी पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याने हे पदक अमूल्य आहे. पुढील वाटचालीसाठी ते प्रेरणादायी आहे.’’

आशियाई स्पर्धेविषयी आणि दडपणाविषयी साक्षी म्हणाली, ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करताना दडपण येणे साहजिकच आहे. मात्र त्याचे भीतीत रुपांतर होऊ न देण्याचे कसब महत्त्वाचे असते आणि त्यासाठी प्रशिक्षकांनी मला भरपूर सहकार्य केले. त्यांनी सतत मला चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा दिली. पण पहिल्या सामन्यात रिंगमध्ये उतरल्यावर थोडेसे दडपण होतेच. त्याचवेळी पदक जिंकण्याचा निर्धार मनाशी पक्का असल्यामुळे एकेक आव्हान पार करत केले. फक्त अंतिम फेरीत अपयशी ठरले.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 2:10 am

Web Title: the success story of sakshi
Next Stories
1 सोळावं जेतेपद मोक्याचं!
2 दिवस-रात्र कसोटी सामन्यावरुन, बीसीसीआय-क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डांमध्ये जुंपली
3 आता दर दोन वर्षांनी होणार फुटबॉल मिनी-विश्वचषक?
Just Now!
X