चौथ्या डावानंतरही बरोबरी कायम

विविध डावपेच करीत विजय मिळविण्यासाठी विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याने आव्हानवीर सर्जी कर्याकिन याच्यावर कुरघोडी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तथापि जिगरबाज खेळाडू म्हणून ओळख असलेल्या कर्याकिन याने त्याचे हे प्रयत्न असफल ठरविले. त्यामुळेच या दोन खेळाडूंमधील विश्वअजिंक्यपद बुद्धिबळ लढतीमधील चौथा डावही बरोबरीत सुटला.

लागोपाठ दोन वेळा विश्वविजेता असलेल्या कार्लसन याला पहिल्या तीनही डावांप्रमाणेच चौथ्या डावातही कर्याकिन याचा पोलादी बचाव तोडण्यात यश मिळाले नाही. या डावाअखेर त्यांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. कर्याकिन याला या डावात पांढऱ्या मोहरांनी खेळण्याचा फायदा होता. त्याने राजापुढील प्याद्याने सुरुवात केली. पाचव्या चालीस त्याने कॅसलिंग करीत आपला राजा सुरक्षित केला. कार्लसन यानेही सातव्या चालीस कॅसलिंग केले. १८व्या चालीस कर्याकिन याने उजव्या बाजूने उंटाच्या साहाय्याने आक्रमण केले. उंटाच्या बदल्यात घोडा घेत आक्रमणासाठी उत्तम व्यूहरचना करण्याचा त्याचा हेतू होता. तथापि, कार्लसन याने त्यास दाद दिली नाही. २४व्या चालीस दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे वजिर घेतले. पाठोपाठ ३०व्या व ३५व्या चालीस एकमेकांचे हत्तीही घेतले. त्या वेळी कर्याकिन याच्याकडे एक उंट, एक घोडा व पाच प्यादी अशी स्थिती होती, तर कार्लसन याच्याकडे दोन उंट व पाच प्यादी अशी स्थिती होती.

दोन्ही खेळाडूंनी त्यानंतर एकमेकांवर आक्रमणासाठी योग्य व्यूहरचना करण्याचा प्रयत्न केला. विश्वअजिंक्यपद लढतीचा भरपूर अनुभव पाठीशी असलेल्या कार्लसन याने कर्याकिन याच्या प्याद्यांची कोंडी करीत आपली दोन प्यादी पुढे नेली. ७४व्या चालीस दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचा काळा उंट घेतला. ८७व्या चालीस कार्लसन हा एक प्याद्याने वरचढ होता. तथापि, त्याची दोन प्यादी एकाच रांगेत आल्यामुळे प्याद्यांचा वजिर किंवा अन्य मोहरा करण्याच्या प्रयत्नात अडथळा निर्माण झाला. कर्याकिन हा खरेतर त्या वेळी पराभवाच्या छायेत होता. मात्र दडपण न घेता त्याने कार्लसन याच्या डावपेचांना सुरुंग लावला व ९४व्या चालीस बरोबरी स्वीकारण्यास भाग पाडले. तिसऱ्या डावाप्रमाणेच या डावातही त्याने राजाच्या साहाय्याने खूप चांगल्या चाली केल्या.