चेन्नईत खेळण्यासाठी दबाव टाकण्यात आला तर जगज्जेत्या विश्वनाथन आनंदविरुद्ध होणाऱ्या विश्वविजेतेपदाच्या लढतीतून मॅग्नस कार्लसन माघार घेण्याची शक्यता आहे, असे मत माजी विश्वविजेत्या रुस्तम कासिमझानोव्ह याने व्यक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (फिडे) आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (एआयसीएफ) यांच्यात शुक्रवारी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानंतर विश्वविजेतेपदाच्या लढतीच्या आयोजनाचे हक्क चेन्नईला देण्यात आले. यावर आनंद आणि कार्लसन या दोघांनीही होकार दर्शवला. मात्र स्वित्र्झलडमधील फिडे ग्रां. प्रि. बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान कासिमझानोव्ह म्हणाला, ‘‘ही लढत भारतात होणार की नाही, याची भीती मला वाटू लागली आहे. चेन्नईत खेळण्यासाठी कार्लसनवर दबावतंत्राचा वापर करण्यात आला तर यासाठी तो नाराज होईल आणि विरोधी भूमिकेत जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या लढतीसाठी त्रयस्थ ठिकाणाचा विचार केल्यास, मला आनंद होईल.’’
विश्वविजेतेपदाच्या लढतीसाठी बाद फेरीचा पर्याय योग्य नसल्याचे मत कार्लसनने याआधी मांडले होते. या लढतीसाठी आनंदच्या प्रतिस्पर्धीसाठीची स्पर्धा कार्लसनने जिंकली होती, त्यामुळे ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्यासाठी आयोजकांवर दबाव आणण्याचे अधिकार कार्लसनकडे आहेत. तसेच भारतातील वातावरण आणि खाद्यसंस्कृती या सर्व गोष्टींशी कार्लसन अपरिचित आहे, असे नॉर्वेच्या प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.