करोनाच्या संकटामुळे या वर्षअखेरीस होणारी भारताविरुद्धची कसोटी आणि ट्वेन्टी-२० मालिका रद्द करण्यात आली तर ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू उद्ध्वस्त होतील, अशी भीती ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज मार्नस लबूशेनने व्यक्त केली आहे.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला ऑक्टोबर महिन्यात ट्वेन्टी-२० मालिकेद्वारे सुरुवात होणार आहे. तसेच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर डिसेंबरमध्ये या दौऱ्याची सांगता होणार आहे; पण प्रवासावरील निर्बंध आणि करोनाचा संसर्ग कधी आटोक्यात येईल, याची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे या दौऱ्याच्या आयोजनाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. या दौऱ्यादरम्यान १८ ऑक्टोबरपासून ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एका ऑनलाइन संवादादरम्यान लबूशेन म्हणाला की, ‘‘सध्या कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सुरू नसल्यामुळे मी स्वत:, सहकारी तसेच देश उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे. करोनाच्या प्रादुर्भावानंतर बरेचसे बदल झाले आहेत. लवकरच ही परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे.’’

सध्या टाळेबंदीच्या काळात ऑस्ट्रेलियातील करोनाबाधितांची संख्या रोडावली असली तरी या देशात ६८०० लोकांना करोनाची बाधा झाली होती आणि १०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे लबूशेनने ऑस्ट्रेलियाच्या आरोग्यव्यवस्थेची स्तुती केली आहे. ‘‘विलगीकरण आणि टाळेबंदीदरम्यान ऑस्ट्रेलिया सरकारने खूपच चांगले काम केले आहे. ऑस्ट्रेलियातील करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने खाली आला आहे. आमच्या आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांनी खूप चांगले काम केले,’’ असे लबूशेनने सांगितले.

लबूशेन सध्या कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असून भारताचा दौरा कोणत्याही अडथळ्याविना पार पडेल, असे त्याला वाटते. ‘‘पुढील ३-४ महिन्यांत ऑस्ट्रेलियातील परिस्थिती नक्कीच सुधारलेली असेल. टाळेबंदीच्या काळात मी माझे कौशल्य सुधारण्यावर भर देत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळ फलंदाजी करण्यावर मी मेहनत घेत आहे. त्याचबरोबर माझ्या गोलंदाजीवरही मी मेहनत घेत आहे,’’ असेही त्याने सांगितले.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिका पहिल्या सामन्यानंतर रद्द करण्यात आली. याविषयी लबूशेन म्हणाला, ‘‘यापूर्वी अशी परिस्थिती कधीही उद्भवली नव्हती. त्यामुळे या कठीण प्रसंगातून काही तरी शिकण्याची संधी मिळाली आहे. या काळात आपल्या खेळाचा आढावा घेण्याची तसेच एक परिपक्व खेळाडू बनण्याची संधी आहे.’’