यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) होऊ शकली नाही तर भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंह धोनी याला भारतीय संघात पुनरागमन करणे कठीण जाईल, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात धोनी भारतीय संघाकडून अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर धोनी व्यावसायिक क्रिकेटपासून दूर आहे. प्रदीर्घ विश्रांतीमुळे धोनीचे पुनरागमन दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, असे मत सुनील गावस्कर आणि कपिल देव या महान खेळाडूंनी व्यक्त केले आहे. धोनीने यंदाच्या ‘आयपीएल’मधून पुनरागमनाचे उद्दिष्ट बाळगले होते.

‘‘यंदाची ‘आयपीएल’ स्पर्धा होऊ शकली नाही तर धोनीला भारतीय संघात परतणे मुश्किल होणार आहे. जवळपास एक किंवा दीड वर्षे क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर धोनी कोणत्या निकषांच्या आधारावर भारतीय संघात पुनरागमन करील,’’ असा सवालही गंभीरने उपस्थित केला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीचा पर्याय म्हणून यष्टीरक्षणाची जबाबदारी लोकेश राहुलवर सोपवावी, असे गंभीरने सुचवले आहे. तो म्हणतो, ‘‘राहुल हा धोनीइतके सफाईदारपणे यष्टीरक्षण करत नसला तरी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. राहुल हा उपयुक्त खेळाडू असून तो यष्टीरक्षणापाठोपाठ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरही फलंदाजी करू शकतो,’’ असेही गंभीरने सांगितले.

धोनीने यापुढेही ‘आयपीएल’मध्ये खेळत राहावे, असे मत गंभीरचा सहकारी व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने व्यक्त केले आहे. लक्ष्मण म्हणाला, ‘‘धोनीने फक्त यंदाच्याच नव्हे तर यापुढील कित्येक वर्षे ‘आयपीएल’मध्ये खेळत राहावे. त्यानंतर धोनीने आपल्या भवितव्याविषयीचा निर्णय घ्यावा. सुनील जोशीच्या अध्यक्षतेखालील नव्या निवड समितीने निवृत्तीबाबत धोनीशी चर्चा करावी. धोनीच्या आपल्या भविष्यातील योजनांची माहिती निवड समितीने जाणून घ्यावी.’’

माजी सहकारी गौतम गंभीरचे मत

निवृत्तीचा निर्णय हा धोनीचा वैयक्तिक असेल. आयपीएल खेळवण्यात आली नाही तर धोनीला पुनरागमनाची संधी मिळणार नाही. धोनीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असले तरी संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूलाच संधी देण्यात यावी, असे माझे मत आहे.