बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्यासारखे आणखी गुणवान खेळाडू जर आयबीएल स्पर्धेतील अनुभवामुळे घडले तरच या स्पर्धेमागचा उद्देश सफल होईल, असे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक नंदू नाटेकर यांनी सांगितले. नाटेकर यांनी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहा वेळा एकेरीत व सहा वेळा दुहेरीत अजिंक्यपद मिळविले आहे. परदेशातील स्पर्धेत विजेतेपद मिळविणारे पहिले भारतीय खेळाडू हा मान त्यांनी मिळविला आहे. नाटेकर स्पोर्ट्स अँड फिटनेस संस्थेचे ते संचालक आहेत. आयबीएल स्पर्धेविषयी नाटेकर यांच्याशी केलेली बातचीत-
आयबीएल स्पर्धेविषयी तुमचे काय मत आहे?
आयपीएल स्पर्धेमुळे क्रिकेटला घराघरात प्रसिद्धी मिळू लागली. खेळाडू व खेळासाठी या स्पर्धेचा खूप फायदा झाला. त्यामुळे अशाच प्रकारची स्पर्धा बॅडमिंटनमध्ये असावी या हेतूने आयबीएल स्पर्धा सुरू करण्यात आली. बॅडमिंटनमध्ये ही नवीन संकल्पना आहे व त्याचे स्वरूपही आकर्षक करण्यात आले आहे. या स्पर्धेतील अनुभवाची शिदोरी घेऊन भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विजेतेपद मिळविले तरच या स्पर्धेमागचा खरा हेतू सफल झाला असे मी म्हणेन.
भारतीय खेळाडूंसाठी या स्पर्धेचा कसा फायदा
होईल?
मुख्य म्हणजे भारतीय खेळाडूंना अनुभवासाठी ही स्पर्धा खूप उपयुक्त ठरणार आहे. बॅडमिंटनविश्वातील मातब्बर खेळाडूंसमवेत खेळण्याची व त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी भारतीय खेळाडूंना मिळणार आहे. परदेशी खेळाडूंबरोबर खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधी मिळाली तर त्याहून भाग्य दुसरे कोणते. परदेशी खेळाडूंकडून केवळ स्पर्धात्मक नव्हे तर अनेक अन्य गोष्टीही शिकण्यासारख्या असतात. आपल्या खेळाडूंनी या खेळाडूंचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे तरच त्याचा फायदा त्यांना भावी कारकिर्दीसाठी होणार आहे.
आयबीएलमुळे या खेळात पैसा मोठय़ा प्रमाणात येत आहे असे तुम्हाला वाटते काय?
हो, निश्चितच. या स्पर्धेद्वारे खेळाला प्रसिद्धी मोठय़ा प्रमाणावर मिळणार आहे व आपोआपच पैसाही येणार आहे. खेळाडूंची कारकीर्द घडत असताना त्याच्या आई-वडिलांना आर्थिक अडचणींशी कसे झगडावे लागते, हा अनुभव मी घेतला आहे. आयबीएलद्वारे खेळाडूंना बऱ्यापैकी स्वावलंबी होण्याची संधी मिळणार आहे. या खेळाडूंच्या आई-वडिलांना आपल्या पाल्यावर कमी खर्च करावा लागेल. स्पर्धेचा कालावधी जेमतेम १८ दिवसांचा आहे आणि या अल्पकाळात भरघोस आर्थिक कमाई खेळाडूंना होणार आहे. त्याचा उपयोग परदेशातील प्रशिक्षण, स्पर्धांमधील सरावावर त्यांनी केला तर भावी कारकिर्दीसाठी ती भांडवली गुंतवणूक होईल.
स्पर्धेतील सामन्यांच्या दर्जाविषयी तुम्ही काय सांगाल?
आयबीएलचा दर्जा निश्चितच चांगला आहे. मात्र खेळाचा दर्जा अधिक उंचावण्याची आवश्यकता आहे. भारतीय खेळाडूंनी आपल्या खेळातील चुकांचे आत्मपरीक्षण करीत आपल्या कामगिरीत सुधारणा केली पाहिजे.
महिला दुहेरीचा सामना या स्पर्धेतून वगळण्यात आला आहे, त्याबाबत काय सांगता येईल?
हा सामना वगळण्याचा निर्णय स्पर्धा संयोजकांनी घेतला आहे. दुहेरीचा एक सामना वाढविला की किमान चार खेळाडू वाढणार. स्पर्धेसाठी एकूण होणारा खर्च लक्षात घेता त्यांनी हा सामना वगळण्याचा निर्णय घेतला असावा. तसेच दुहेरीपेक्षा एकेरीच्या सामन्यास प्रेक्षकांकडून जास्त मागणी असते. शेवटी स्पर्धेस मिळणारी प्रसिद्धी व पुरस्कर्ते यांचाही विचार संघटकांना करावा लागतो. त्यामुळेच त्यांनी महिला दुहेरीस यंदा स्थान दिले नसावे. अर्थात हा पहिलाच प्रयोग आहे. कदाचित पुढच्या लीगमध्ये या सामन्याचा समावेश होऊ शकेल. ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली गेली तर या खेळाची लोकप्रियता अधिक वाढणार आहे.