न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेत भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी हे पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. संघाचा महत्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेत एकही बळी मिळवता आला नाही. शार्दुल ठाकूर-नवदीप सैनी यांनी काही बळी घेतले, मात्र यासाठी त्यांना प्रचंड धावा मोजाव्या लागल्या. माजी भारतीय गोलंदाज आशिष नेहराने यावेळी बुमराहची पाठराखण केली असून, प्रत्येक सामन्यात बुमराह चांगली कामगिरी करु शकणार नाही असं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – ICC ODI Ranking : जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान गमावलं

“प्रत्येक मालिकेत जसप्रीत बुमराह चांगली कामगिरी करेल ही अपेक्षा करता येत नाही. आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की तो दुखापतीमधून पुनरागमन करतो आहे. अव्वल स्थानी पोहचलेल्या प्रत्येकाला दीर्घ काळ चांगली कामगिरी करत राहणं शक्य होत नाही, विराटही या मालिकेत अपयशी ठरला. त्यामुळे इतर गोलंदाजांनी आपली जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे. संघ व्यवस्थापनाला अंतिम ११ जणांचा संघ निवडताना थोडी चलाखी दाखवावी लागणार आहे. बुमराह आणि शमीव्यतिरीक्त इतर गोलंदाजांनी आपली जबाबदारी ओळखावी. सध्या बुमराहवर प्रचंड दबाव आहे”, टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलताना नेहराने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – एकही विकेट न मिळालेल्या बुमराहला झहीरचा मोलाचा सल्ला, म्हणाला…

न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत भारताला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ मार्च महिन्यात घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.