माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्रींच्या हाती भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली. त्यानंतर पहिल्याच कसोटीत भारतीय संघाने श्रीलंकेवर मात केली आणि आपल्या दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. या प्रसंगी रवी शास्त्री यांनी ‘क्रिकेटनेक्स्ट’ या वेबसाईटशी संवाद साधला.
यावेळी शास्त्रींनी प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये विश्वासाचं नात तयारं होण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. याआधीही संघाला चांगले प्रशिक्षक असूनही काही खेळाडूंची कामगिरी चांगली होत नव्हती, जर प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये विश्वासाचं नात नसेल तर खेळाडू मैदानात चांगली कामगिरी कशी करतील?? असं म्हणत शास्त्रींनी नाव न घेता कुंबळेंच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.

माझ्यासाठी ड्रेसिंग रुमही एखाद्य़ा मंदिराप्रमाणे आहे. तुम्ही एकदा ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केलात की तुमच्या सगळ्या गोष्टी इथे टिकून राहतात. कदाचीत ज्या गोष्टी तुम्हाला बाहेर बोलताना त्रास होत असेल, त्या गोष्टी खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये मोकळेपणाने बोलू शकतात. म्हणूनच ड्रेसिंग रुममध्ये वातावरण चांगलं राहणं हे गरजेचं असल्याचं रवी शास्त्री यांनी म्हणलं आहे.

याव्यतिरीक्त शास्त्री यांनी कर्णधार हा संघाचा बॉस असल्याचं सांगितलं. प्रशिक्षक एक चांगला संघ घडवू शकतो किंवा तो तयार करु शकतो, मात्र त्या संघाला घेऊन मैदानात चांगली कामगिरी करण्याचं काम हे कर्णधाराचं असतं. त्यामुळे कर्णधाराचं मत विचारात घेणं हे प्रत्येक प्रशिक्षकाचं काम असल्याचं शास्त्री यांनी सांगितलंय. त्यामुळे आपल्या या मुलाखतीतून शास्त्री यांनी कुंबळेंच नाव जरी घेतलं नसलं तरीही त्यांचा निशाणा हा त्यांच्यात कार्यपद्धतीवर असल्याचं कळून येत होतं.

पहिल्या कसोटी विजय मिळवल्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या कोलंबोच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय हे पहावं लागणार आहे.