‘आयपीएल’नंतर लगेचच भारताचे क्रिकेटपटू प्रदीर्घ कालावधीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दुबईहूनच रवाना होणार आहेत. मात्र करोनामुळे जैव-सुरक्षित वातावरणात खेळाडूंना राहावे लागत असल्याने प्रदीर्घ कालावधीच्या दौऱ्यांचा विचार व्हावा, असे मत कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.

‘आयपीएल’मुळे गेले दोन महिने क्रिकेटपटू जैव-सुरक्षित वातावरणात आहेत. मात्र आता त्यातून ऑस्ट्रेलियात पुन्हा ते जैवसुरक्षित वातावरणात राहण्यासाठी जाणार आहेत. त्याचा खेळाडूंवर ताण येत असल्याचे कोहलीचे म्हणणे आहे. ‘‘आम्ही सर्व संघ सहकारी हे एकमेकांसोबत मिळूनमिसळून राहत आहोत. जैव-सुरक्षित वातावरणातील वेळ आनंदात जात असल्यामुळे आम्हाला खेळाचाही आनंद घेता येत आहे. मात्र सतत ८० दिवस अशा वातावरणात राहणे मानसिकदृष्टय़ा कठीण असल्याने थोडा वेळ कुटुंबियांसह बाहेर जाण्याची परवानगी द्यावी,’’ असे कोहली म्हणाला. खेळाडूचे मनोबल हे नेहमीच उंचावलेले असणे आवश्यक आहे. खेळाडूच्या मनोधैर्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवरही होत असतो, असेही कोहलीने म्हटले.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करननेही जैव-सुरक्षिततेच्या नियमांविषयी नाराजी व्यक्त केली होती. ‘‘खेळाडूंना कोणत्या स्पर्धेत खेळायचे हे निवडण्याचा अधिकार असायला हवा. जर तीनही प्रकारात खेळणारा खेळाडू असेल तर त्याला सातत्याने जैव-सुरक्षित वातावरणात राहणे कठीण आहे,’’ असे करन म्हणाला.

शेरेबाजीची कोहलीला चिंता नाही -वॉ

शेरेबाजी ही विराट कोहलीसमोर चिंतेचा विषय नाही, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने भारताविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेपूर्वी म्हटले आहे. ‘‘शेरेबाजी करून कोहलीसारख्या दर्जेदार फलंदाजाला डिवचण्याचा काहीच उपयोग नाही. शेरेबाजी केली तर कोहली आणखी आक्रमक फलंदाजी करू शकतो. तामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कोहलीला न डिवचणेच योग्य ठरेल,’’ असे वॉ म्हणाला.