इंग्लंडमध्ये २०१९ रोजी पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. तर भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतचं संपुष्टात आलं. अनेक पाकिस्तानी खेळाडू आणि चाहत्यांच्या मते, पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीत येऊ नये यासाठी भारताचा संघ साखळी फेरीत इंग्लंडविरुद्ध सामन्यात हरला. मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल-हकच्या मते २०१९ विश्वचषकाच्या दरम्यान पाकिस्तानी संघात भीतीचं वातावरण होतं.

२०१९ विश्वचषकादरम्यान, पाकिस्तानी कर्णधारासह सर्व खेळाडू दबावाखाली होते असं मला जाणवलं. जर स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही तर आम्ही बाहेर जाऊ ही भीती त्याच्या मनात होती. संघासाठी असं वातावरण तयार केलं गेलं…ज्यामुळे खेळाडूंच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालं. खेळासाठी हे योग्य नाही. सरफराजच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करत होता, काही सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघ जिंकला होता. पण विश्वचषकानंतर त्याला कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं, त्याला आणखी संधी मिळायला हवी होती. सरफराजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकला होता, यानंतर टी-२० मध्येही पाकिस्तान अव्वल स्थानावर पोहचला होता, पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इंझमामने आपलं मत मांडलं.

२०१९ विश्वचषकानंतर पाक क्रिकेट बोर्डाने संघात मोठे बदल केले. माजी खेळाडू मिसबाह उल-हक याला संघाचं प्रशिक्षकपद आणि निवड समितीप्रमुख पद देत सरफराजला कर्णधारपदावरुन हटवलं. सध्या पाकिस्तानी कसोटी संघाचं कर्णधारपद अझर अलीकडे देण्यात आलं असून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये बाबर आझम पाकिस्तानी संघाचा कर्णधार आहे. सध्या पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे.