दिल्लीच्या मैदानावर पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागलेला भारतीय संघ आता सावध झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गुरुवारी राजकोटच्या मैदानावर दुसरा टी-२० सामना खेळणार आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल होऊ शकतो असे संकेत दिले आहेत.

“आमची फलंदाजी चांगली आहे. त्यामुळे यामध्ये काही बदल करावे लागतील असं मला वाटत नाही. मात्र आम्ही खेळपट्टीची पाहणी करु, आणि त्यानंतर कोणाला संघात जागा मिळेल याबद्दल निर्णय घेतला जाईल.” रोहितने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या टी-२० सामन्यात मुंबईकर शार्दुल ठाकूरला संघात जागा मिळू शकते. खलिल अहमदने पहिल्या टी-२० सामन्यात स्वैर मारा केला होता.

३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा संघ सध्या १-० ने आघाडीवर आहे. त्यातच गुरुवारी होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट असल्यामुळे भारतासमोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात खेळ झाल्यास भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.