महेंद्रसिंह धोनीला डावलून बीसीसीआयच्या निवड समितीने ऋषभ पंतला विंडीज दौऱ्यापासून संघात यष्टीरक्षणाची संधी दिली. याचसोबत आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता ऋषभ पंत हाच यापुढे पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल असं निवड समितीने स्पष्ट केलं. मात्र मिळालेल्या संधीचं सोन करण्यात ऋषभ अपयशी ठरलाय. विंडीज दौऱ्यात ऋषभ फलंदाजीमध्ये पुरता अपयशी ठरला. एक-दोन खेळींचा अपवाद वगळला तर ऋषभने आपली विकेट अक्षरशः विंडीजच्या गोलंदाजांना बहाल केली. त्याच्या याच खेळीवर भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री नाराज आहेत.

अवश्य वाचा – ४-५ संधी मिळतील, स्वतःला सिद्ध करा ! कर्णधार विराटचा नवोदीत खेळाडूंना सल्ला

“सध्या आम्ही ऋषभला स्थिरावण्याचा वेळ देत आहोत. मात्र त्रिनिनादमध्ये झालेल्या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट फेकली होती. यापुढे तो मला असा फटका खेळताना दिसला तर त्याला फटके मिळतील. खेळ दाखव नाहीतर परिणाम भोगायला तयार रहा ! तु तुझ्या खेळीमुळे संपूर्ण संघाचं मनोधैर्य खच्ची करतोयस. तुझ्या समोर कर्णधार साथ द्यायला आहे, संघाला एक विजयासाठी एक लक्ष्य मिळालेलं आहे, अशावेळी असा बेजबाबदार फटका खेळून बाद होणं केवळ अमान्य आहे. तुझ्याकडून आता चांगल्या आणि संयमी खेळाची अपेक्षा आहे.” रवी शास्त्री Star Sports वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ऋषभ पंतविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

ऋषभने आपल्या खेळाची शैली बदलावी अशी अपेक्षा नाहीये. मात्र सामन्याचं चित्र नेमकं कसं आहे आणि त्यानुसार आपला खेळ कसा करायचा हे अपेक्षित आहे. जर ऋषभला हे साध्य झालं तर त्याला कोणीच थांबवू शकत नाही. याला कदाचीत थोडा वेळ लागेल, तो आयपीएल क्रिकेट खेळला आहे. मात्र ऋषभने आता जबाबदारीने खेळ करणं अपेक्षित आहे. शास्त्री ऋषभ पंतच्या खेळाविषयी बोलत होते. आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसरा टी-२० सामना बुधवारी चंदीगढच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.