महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीच्या हाती भारतीय संघाच्या कसोटी आणि वन-डे संघांचं नेतृत्व आलं. आतापर्यंत कर्णधार या नात्याने ३० वन-डे सामन्यांमध्ये विराट कोहलीने २२ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर २८ पैकी १८ कसोटी सामना कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकले आहेत. विराट कोहलीचं कर्णधार या नात्यानं पहिल्या १० सामन्यांनंतर क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांमध्ये विजय मिळवण्याचं प्रमाण हे भारताच्या इतर कर्णधारांपेक्षा जास्त आहे.

या आकडेवारीमुळे अल्पवधीतच विराटने भारतीय संघावर कर्णधार या नात्याने चांगली पकड बसवली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने आपले बहुतांश सामने हे घरच्या मैदानावर खेळले असले, तरीही कोहलीच्या नेतृत्वाखाली काही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झालेली पहायला मिळते.

५. मोहम्मद शमी

धोनीच्या कार्यकाळात दुर्लक्षित झालेल्या मोहम्मद शमीवर विराट कोहलीने कर्णधार म्हणून विश्वास ठेवला. संघाची सुत्र आपल्या हाती आल्यानंतर कोहलीने संघासाठी जलदगती गोलंदाज महत्वाचे असल्याचं सांगत शमीला महत्वाची जबाबदारी देण्याचे संकेत दिले होते.

कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना शमीची कामगिरी ही नक्कीच वाखणण्याजोगी आहे. १४ कसोटी सामन्यांमध्ये शमीने २८.२३ च्या सरासरीने ४३ बळी घेतले आहेत. उमेश यादवच्या सोबतीने मोहम्मद शमी सध्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा महत्वाचा गोलंदाज बनलेला आहे.

४. उमेश यादव

उमेश यादवने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर केलेली कामगिरी ही त्याला भारतीय संघात स्थान मिळवून देण्यासाठी महत्वाची ठरली. मात्र कामगिरीत सातत्य राखणं त्याला जमलं नाही. मात्र कोहलीच्या नेतृत्वाखाली उमेश यादवला भारतीय संघात आणखी एक संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा उचलत उमेश यादवने आपल्या गोलंदाजीत सुधारणा करत कर्णधाराचा विश्वास कमावला. सध्या उमेश यादव हा भारताचा कसोटी क्रिकेटमधला पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना उमेश यादवने २१ कसोटीत ४५ बळी घेतले आहेत. तर वन-डे सामन्यांमध्ये उमेश यादवने १५ सामन्यांमध्ये २५ बळी घेतले आहेत.

३. चेतेश्वर पुजारा –

कर्णधारपदाची सुत्र हातात घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात विराट कोहलीने चेतेश्वर पुजारा संघातून वगळलं होतं. पुजाराने आपल्या फलंदाजीत आणखी सुधारणा करुन संघात आपलं स्थान पक्क करावं अशी कोहलीची इच्छा होती. याचप्रमाणे चेतेश्वर पुजाराने काऊंटी क्रिकेटमध्ये खेळत, आपल्या फलंदाजी शैलीत बदल केला. यानंतर कसोटी संघातली तिसऱ्या क्रमांकाची जागा ही चेतेश्वर पुजाराच्या नावे कायम करण्यात आली आहे.

कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळतना २३ कसोटी सामन्यांमध्ये पुजाराने २ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. यादरम्यान पुजाराची सरासरी ही तब्बल ६२.५१ एवढी राहिलेली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली पुजाराने २६ कसोटी खेळल्या आहेत. मात्र धोनीच्या नेतृत्वाखाली पुजाराची सरासरी ही ५० पेक्षाही कमी आहे.

२. रविंद्र जाडेजा –

गेल्या काही वर्षांमध्ये रविंद्र जाडेजा हा अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना रविंद्र जाडेजाने गोलंदादीतही आपली कामगिरी सुधारली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना जाडेजाने १९ कसोटीत तब्बल १०६ बळी घेतले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना जाडेजाने २ वेळा ५ किंवा ५ पेक्षा जास्त बळी घेतले होते. मात्र कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना जाडेजाने ही किमया ७ वेळा केली आहे.

१. लोकेश राहुल –

विराट कोहलीसोबत रॉयल चँलेजर्स बेंगलोर संघाकडून खेळल्याचा लोकेश राहुलला फायदा झाला. आयपीएलमध्ये कोहलीचा विश्वास जिंकल्यानंतर लोकेश राहुलला कसोटी संघात जागा मिळाली.

ज्यावेळी मुरली विजयला जोडीदार म्हणून शिखर धवनला संधी मिळणार की गौतम गंभीरला अशी चर्चा सुरु असताना, लोकेश राहुलला संधी देण्यात आली. ज्याचा त्याने फायदा उचलत खणखणीत कामगिरी बजावली. त्यामुळे कसोटी संघात आता मुरली विजयसोबत लोकेश राहुल हा सलामीला फलंदाजीसाठी येतो.