२००७ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने फार कमी कालावधीत भारतीय संघात आपली ओळख निर्माण केली. सध्या भारतीय संघात रोहित सलामीवीराची भूमिका बजावतो आहे. आज रोहितचा वाढदिवस आहे, जगभरातून त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. लॉकडाउन काळात रोहित आपली पत्नी आणि मुलीसोबत घरात राहून साध्या पद्धतीने आजचा दिवस साजरा करणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने अनेक विक्रम रचले आहेत. भविष्यकाळात त्याचे काही विक्रम इतर खेळाडू मोडतीलही.

परंतु मुंबईकर रोहितच्या वाढदिवसानिमीत्त, आम्ही त्याच्या अशा ५ विक्रमांबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत की हे विक्रम मोडणं सध्यातरी कोणत्याही खेळाडूला शक्य नाहीये.

१) वन-डे क्रिकेटमध्ये ३ द्विशतकं –

रोहित शर्माने वनडेमध्ये ३ द्विशतके केली आहेत. असा पराक्रम करणारा तो पहिला आणि सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे. आत्तापर्यंत वनडेमध्ये केवळ ६ खेळाडूंना द्विशतक झळकावण्यात यश आलं आहे. त्यातील रोहित व्यतिरिक्त अन्य ५ खेळाडूंनी केवळ एकदा द्विशतक केले आहे. यावरुन रोहित शर्मा सध्या किती चांगल्या फॉर्मात आहे याचा आपल्याला अंदाज आलाच असेल.

  • पहिलं द्विशतक – २ नोव्हेंबर २०१३ विरुद्ध ऑस्ट्रेलिया – २०९ धावा
  • दुसरं द्विशतक – १३ नोव्हेंबर २०१४ विरुद्ध श्रीलंका – २६४ धावा (वन-डे मधली सर्वोत्तम खेळी)
  • तिसरं द्विशतक – १३ डिसेंबर २०१७ विरुद्ध श्रीलंका – २०८ धावा

२) वन-डे क्रिकेटमध्ये २६४ धावांची खेळी –

कोलकात्याच्या मैदानात रोहित शर्माने लंकन गोलंदाजांची धुलाई करताना १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षटकारांच्या सहाय्याने २६४ धावा कुटल्या होत्या. वन-डे क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वोत्तम धावसंख्या मानली जाते. या खेळीत रोहितने १८६ धावा या नुसत्या चौकारांवर वसुल केल्या होत्या. रोहितचा हा विक्रम मोडणंही सध्याच्या काळात कठीणच दिसतंय. आतापर्यंत वन-डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंना २४० धावसंख्येचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

३) एका विश्वचषकात ५ शतके –

इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने ५ शतकं झळकावली होती. याआधी कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नव्हती. ५ शतकांच्या सहाय्याने रोहितने या स्पर्धेत ६४८ धावा केल्या होत्या.

४) आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं –

रोहितच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ४ शतकांची नोंद आहे. २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यात रोहितने पहिल्यांदा शतक झळकावलं. या सामन्यात रोहितने १०६ धावा केल्या होत्या. यानंतर २०१७ साली श्रीलंकेविरुद्ध ११८ धावा, २०१८ साली विंडीज आणि इंग्लंडविरुद्ध अनुक्रमे १११ आणि १०० धावांची खेळी केली होती. आतापर्यंत एकाही खेळाडूला रोहितसारखी कामगिरी करता आलेली नाही.

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ३ शतकांची नोंद आहे.

५) आयपीएलची ५ विजेतेपद जिंकणारा खेळाडू –

आयपीएलमध्ये ५ विजेतेपद जिंकणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे. २००९ साली डेक्कन चार्जर्स संघाकडून एकदा तर २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या चार वर्षांत मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.