इंग्लंडने दिलेल्या ३२३ धावांचा पाठलाग करताना लॉर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दुसरा वन-डे सामना इंग्लंडने ८६ धावांनी जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दिलेलं आव्हान भारतीय फलंदाजांना झेपलं नाही, त्यातच ठराविक अंतराने भारताच्या विकेट पडत गेल्यामुळे इंग्लंडला सामन्यात विजय मिळवणं शक्य झालं. भारताकडून सुरेश रैना आणि विराट कोहलीने चौथ्या विकेटसाठी केलेली ८० धावांची भागीदारी सर्वोत्तम ठरली. याव्यतिरीक्त एकही भारतीय फलंदाज आपली छाप पाडू शकला नाही. धोनीने आंतरराष्ट्रीय वन-डे कारकिर्दीत दहा हजार धावांचा टप्पा पार केला. मात्र सोबतीला कोणताही खंदा फलंदाज नसल्यामुळे त्यानेही धीमा खेळ करणं पसतं केलं. धोनी माघारी परतल्यानंतर भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तबच झालं.

मात्र पराभवानंतरही दुसऱ्या सामन्यात ९ विक्रमांची नोंद करण्यात आलेली आहे.

० – जो रुटने दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत वन-डे क्रिकेटमधल्या १२ व्या शतकाची नोंद केली. आतापर्यंत मार्कस टेस्कॉथिकचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला रुटएवढी शतकं झळकावता आलेली नाहीयेत.

१ – ५० च्या सरासरीने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा धोनी हा पहिला फलंदाज ठरला आहे.

१ – २२ वन-डे सामन्यांनंतर सर्वाधिक बळी घेण्याची किमया केवळ श्रीलंकेच्या अंजता मेंडीसला करता आलेली आहे. भारताच्या कुलदीप यादवच्या नावावर ४८ बळी जमा आहेत. मेंडीसने ५५ बळी घेतले होते.

२ – चेंडूचा निकष लावला असता महेंद्रसिंह धोनी हा सर्वात जलद १० हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. धोनीने ११ हजार ३२१ चेंडूंमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने ११ हजार २९६ चेंडूमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

२ – कुमार संगकारानंतर १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा धोनी दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे.

३ – धोनीच्या आधी केवळ ३ भारतीय फलंदाजांना वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करता आलेल्या आहेत. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी दहा हजार धावा केल्या आहेत. धोनी हा टप्पा गाठणारा चौथा भारतीय फलंदाज ठरलाय.

४ – वन-डे क्रिकेटमध्ये ३०० झेल घेणारा धोनी चौथा यष्टीरक्षक ठरलाय. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर सर्वाधिक ४१७ झेल जमा आहेत.

४ – भारतावर ८६ धावांनी मिळवलेला विजय हा इंग्लंडचा वन-डे इतिहासातला चौथा मोठा विजय ठरला आहे. १९७५ साली लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंडने २०२ धावांनी सामना जिंकला होता.

७ – दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाज एकही षटकार लगावू शकले नाहीत. गेल्या सात वर्षांमधली वन-डे क्रिकेटमधली ही पहिलीच वेळ ठरली आहे. (निकष संपूर्ण ५० षटकं खेळल्याचा) याआधी २०११ साली विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध उपांत्य सामन्यात मोहालीच्या मैदानात भारतीय फलंदाजांनी एकही षटकार लगावला नव्हता.