पोखरा : भारताच्या महिला फुटबॉल संघाने सोमवारी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील सलग तिसऱ्या सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. अंतिम फेरीत यजमान नेपाळला २-० असे पराभूत करून भारताने विजेतेपद मिळवले.

बाला देवीने दोन गोल नोंदवून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. २९ वर्षीय बालाने स्पर्धेत सर्वाधिक पाच गोल झळकावले. त्याशिवाय गोलरक्षक आदिती चौहाननेसुद्धा संपूर्ण स्पर्धेत एकही गोल न स्वीकारता भारतासाठी बहुमूल्य योगदान दिले.

सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर देणाऱ्या बालाने १८व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर मध्यंतरापर्यंत भारताने १-० अशी आघाडी कायम राखली. दुसऱ्या सत्रात प्रशिक्षक मेमॉल रॉकी यांनी मनीषाला संध्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून पाठवले आणि मनीषाने काही मिनिटांतच संधीचे सोने केले. ५६व्या मिनिटाला रत्नबालाने ३० यार्ड लांबून दिलेल्या पासला मनीषाने बालाच्या दिशेने वळवले आणि गोलजाळ्यासमोरच उभ्या असलेल्या बालाने वैयक्तिक आणि संघासाठी दुसरा गोल करून संघाचा विजय साकारला.