आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येत्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटचं महत्व अधिक अधोरेखित होणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाला मागे टाकत अहमदाबाद येथे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलं. या मैदानात १ लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्नच्या मैदानाची प्रेक्षकक्षमता ही ८० हजार एवढी आहे. यानंतर जगातलं तिसरं मोठं क्रिकेट मैदानही भारतात तयार होणार आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनने याबद्दलची घोषणा केली असून, या मैदानाची क्षमता ७५ हजार एवढी असणार आहे.

या मैदानासाठी जयपूर जवळील चौम्प गावाजवळ जमीन निश्चीत करण्यात आलेली असून, सुमारे १०० एकर जमिनीवर हे मैदान उभारलं जाणार आहे. इनडोअर प्रॅक्टीस, कार पार्किंग यासह अनेक अत्याधुनिक सेवा या मैदानात दिल्या जाणार आहेत. हे मैदान तयार करण्यासाठी ३५० कोटींचा खर्च अपेक्षित असून या मैदानाचं डिजाईन तयार झाल्याचं कळतंय. राजस्थान क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, हे मैदान दोन टप्प्यांमध्ये बनवलं जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात ४५ हजार प्रेक्षकांना बसता येईल या पद्धतीने मैदान सुरु करण्यात येईल, यानंतर दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता ७५ हजारापर्यंत वाढवली जाणार आहे. पहिल्या टप्प्याचं काम हे दोन वर्षांत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. राजस्थानमध्ये जयपूर शहरात सध्या ३० हजार आसन क्षमता असलेलं मैदान कार्यरत असून या मैदानावर आयपीएलचे सामनेही खेळवले गेले आहेत. मात्र गेल्या बऱ्याच महिन्यांपासून या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेलेला नाही. त्यामुळे जगातलं तिसरं मोठं क्रिकेट मैदान कधी तयार होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.