निर्भेळ यशासाठी भारतीय महिला संघ सज्ज!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना आज

भारत-द. आफ्रिका महिला क्रिकेट

सलग दोन सामन्यांत दमदार विजय मिळवल्यानंतर सोमवारी रंगणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन करण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज आहे.

मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने पहिल्या लढतीत युवा प्रिया पुनिया आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या अर्धशतकांच्या बळावर आफ्रिकेला आठ गडी राखून धूळ चारली. तर पुनम राऊत आणि मिताली यांनी अनुभवाचा नजराणा पेश करत भारताला दुसऱ्या लढतीत पाच गडी राखून विजयी करतानाच मालिकेत २-० अशी आघाडी मिळवून दिली.

अनुभवी सलामीवीर स्मृती मानधनाची अनुपस्थिती सलामीवीर प्रिया आणि जेमिमा यांनी जाणवू दिली नाही. तर मधली फळीही भारतासाठी सातत्याने योगदान देत आहे. गोलंदाजीत झुलन गोस्वामी व शिखा पांडे यांची जोडी आणि दीप्ती शर्मा, अनुजा पाटील आणि पूनम यादव यांचे फिरकी त्रिकूट प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर अंकुश ठेवण्याचे काम चोखपणे बजावत आहेत.

दुसरीकडे किमान या सामन्यात चमकार कामगिरी करून भारतीय दौऱ्याची विजयाने सांगता करण्याचे लक्ष्य आफ्रिकेचे असेल. नॅडिन डीक्लर्क, मिग्नो डूप्रीझ आणि लॉरा वॉल्वरडर्ट यांच्यावर आफ्रिकेची प्रामुख्याने मदार आहे.

READ SOURCE