ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज रंगणार

आतापर्यंत गोलंदाजीचा विभाग भारतासाठी कच्चा दुवा समजला जायचा, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या एकदिवसीय क्रिकेट मालिकेचा विचार केला तर गोलंदाजांनी भारताला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे भेदक आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने रविवारी मालिका विजयाचा निर्धार केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. पण गोलंदाजीने भारताला तारले आहे. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही ऑस्ट्रेलियाच्या मुख्य फलंदाजांना सहजपणे बाद करताना दिसत आहेत. या दोघांपुढे ऑस्ट्रेलियाचे नामांकित फलंदाज लोटांगण घालताना दिसत आहे. दुसरीकडे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोघांनी आपल्या फिरकीच्या तालावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना नाचवले आहे. गेल्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतल्यावर कुलदीपचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून कशी कामगिरी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाही गोलंदाजीमध्ये आपली चमक दाखवताना दिसत आहे.

भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी असेल ती फलंदाजीची. कारण गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या एकाही फलंदाजाला सातत्य दाखवता आलेले नाही. पहिल्या सामन्यात भारताचा अर्धा संघ शतकाची वेस ओलांडण्यापूर्वीच तंबूत परतला होता. त्या वेळी महेंद्रसिंग धोनी आणि पंडय़ाने भारताला सावरले होते. ईडन गार्डन्सवरच्या दुसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या खेळीमुळे भारताला २५२ धावांपर्यंत मजल मारता आली होती. गेल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्माला सूर गवसलेला दिसत नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा मनीष पांडे हा सपशेल अपयशी ठरला आहे. तिसऱ्या सामन्यासाठी पांडेच्या जागी संघात लोकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केदार जाधवलाही लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे मालिका विजयाचा निर्धार करताना भारताला फलंदाजीवर अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाकडूनही चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. खासकरून वेगवान गोलंदाज नॅथन कोल्टर-नाइल हा सातत्याने भेदक मारा करत भारताच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणत आहे. नॅथनला पॅट कमिन्स सुरेख साथ देताना दिसत आहे. पण अ‍ॅडम झम्पा असो किंवा अ‍ॅश्टॉन अगर असो, या दोन्ही फिरकीपटूंना चांगला मारा करता आलेला नाही. दुसरीकडे फलंदाजीही ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी असल्याचे समोर येत आहे. धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची बॅट अजूनही म्यान असलेली पाहायला मिळाली आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले असले तरी त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले आहे. ऑस्ट्रेलियासाठी सर्वात चांगली बाब म्हणजे त्यांचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिस चांगल्या फॉर्मात आला आहे. गेल्या सामन्यात त्याने बळी मिळवूनही सर्वाधिक धावा करण्याची किमया साधली होती. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव प्रकर्षांने जाणवत आहे. त्यामुळे त्यांना जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांनी फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, उमेश यादव, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, हिल्टन कार्टराइट, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), नॅथन कोल्टर-नाइल, पॅट कमिन्स, जेम्स फॉल्कनर, पीटर हँड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, ग्लेन मॅक्सवेल, अ‍ॅडम झम्पा, केन रिचर्ड्सन, मार्कस स्टोइनीस, आरोन फिंच.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर वाहिनी.