मैदानावरील पंचांचा ताण कमी करण्यासाठी ‘आयसीसी’चा प्रयोग

दुबई : गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या ‘नो-बॉल’ प्रकरणावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अखेरीस तोडगा काढला असून आता मैदानावरील पंचांऐवजी तिसरे पंच गोलंदाजाच्या पायावर लक्ष ठेवून चेंडू ‘नो-बॉल’ आहे की नाही, याचा निर्णय घेणार आहेत. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या भारत-वेस्ट इंडिज ट्वेन्टी-२० मालिकेत या नव्या प्रयोगाची अंमलबजावणी होणार आहे.

हैदराबाद येथे भारत-विंडीजमध्ये पहिला ट्वेन्टी-२० सामना रंगणार असून त्यानंतर खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतसुद्धा हा नियम लागू करण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वीच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामात ‘नो-बॉल’ तपासण्यासाठी मैदानावर अतिरिक्त पंच ठेवण्याबाबत चर्चा झाली; परंतु आता मात्र ‘आयसीसी’ने तिसऱ्या पंचांनाही जबाबदारी सोपवली आहे.

‘‘भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेत मैदानावरील पंचांऐवजी तिसरे पंच ‘नो-बॉल’चा निर्णय घेतील. गोलंदाजाने रेषेच्या पुढे जाऊन चेंडू टाकला असेल, तर क्षणार्धातच तिसरे पंच तो चेंडू ‘नो-बॉल’ असल्याचे मैदानावरील पंचांना कळवतील. त्यामुळे मैदानावरील पंचांकडून फारशी चूक होणार नाही आणि त्यांच्यावरील ताणही कमी होईल,’’ असे ‘आयसीसी’ने निवेदनपत्रात नमूद केले.

‘‘एखाद्या वेळेस तिसऱ्या पंचांना ‘नो-बॉल’ कळवण्यास उशीर झाला तरी मैदानावरील पंच त्यानुसार निर्णय घेऊन फलंदाजी करणाऱ्या संघाला त्याची धाव देऊ शकतात. तसेच फलंदाज बाद झाल्यावर प्रत्येक वेळी मैदानावरील पंच ‘नो-बॉल’ची तिसऱ्या पंचांकडून खात्री करतील,’’ असेही ‘आयसीसी’ने सांगितले. २०१६ मध्ये इंग्लंड-पाकिस्तान एकदिवसीय मालिकेत या प्रयोगाची चाचणी करण्यात आली होती.