१६ मार्च २०१२ हा दिवस भारतीय क्रिकेट प्रेमींच्या मनात कायम राहणार आहे. भारतासह जगभरातील कोट्यवधी क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेल्या सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी ८ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं आपलं १०० वं शतक झळकावलं होतं. तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर आजपर्यंत हा विक्रम अबाधित आहे.

आशिया चषकादरम्यान बांगलादेशविरुद्ध शेर-ए-बांगला मैदानात सचिनने ११४ धावांची खेळी केली. याआधी सचिनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतकं जमा होती. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध वन-डे सामन्यात झळकावलेलं शतक हे सचिनचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं शंभरावं शतक ठरलं. तब्बल एका वर्षाच्या कालावधीनंतर सचिनने हे शतक झळकावल्यामुळे त्याच्या या खेळीला महत्व प्राप्त झालं होतं.

शंभराव्या शतकासोबत १६ मार्च हा दिवस सचिनसाठी आणखी एका कारणामुळे खास आहे. २००५ साली पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात सचिनने आपली दहा हजारावी धाव काढली होती. २०१३ साली सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. त्यानंतर अनेक वर्ष सचिनचे अनेक विक्रम अबाधित आहेत.