भारतीय संघाने १९८३ साली पहिल्यांदा वन डे विश्वचषक जिंकला आणि इतिहास रचला. सलग दोन विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडीजची विजेतेपदाची हॅटट्रिक भारतीय क्रिकेट संघाने होऊ दिली नाही. २५ जूनला कपिल देवच्या संघाने विश्वचषक जिंकला, त्या विश्वविजेतेपदाची पायाभरणी १८ जून १९८३ ला करण्यात आली. विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला झिम्बाब्वेला पराभूत करणे गरजेचे होते. कपिल देवच्या संघाने १९८३ साली आजच्याच दिवशी झिम्बाब्वेला नमवून ‘अंतिम चार’ची फेरी गाठली होती.

नाणेफेक जिंकून कपिल देवने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुनील गावस्कर, के श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील स्वस्तात बाद झाले. कपिल देव मैदानात फलंदाजी आला, तेव्हा यशपाल शर्माही बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था ५ बाद १७ झाली होती. त्यावेळी कपिल देव आणि रॉजर बिन्नी या दोघांनी डाव सावरला. कपिल देवने धडाकेबाज खेळी करत नाबाद १७५ धावा चोपल्या. विश्वचषक सामन्यात भारतीय फलंदाजाने केलेले हे पहिले शतक होते. कपिलने १३८ धावांत १६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ही दमदार खेळी करून दाखवली. रॉजर बिन्नी, मदन लाल आणि सय्यद किरमाणी यांच्यासोबत केलेल्या छोट्या भागीदारींच्या जोरावर कपिलने भारताला निर्धारित षटकांमध्ये ८ बाद २६६ धावांचा आकडा गाठून दिला.

भारताने दिलेल्या २६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ मात्र २३५ धावांवर माघारी परतला. झिम्बाब्वेकडून केविन करनने ७३ धावांची खेळी केली, पण इतर फलंदाजांच्या वाईट कामगिरीमुळे झिम्बाब्वेला ३१ धावांनी सामना गमवावा लागला. गोलंदाजीतही कपिलने ११ षटके फेकत केवळ ३२ धावा दिल्या आणि १ बळी टिपला. धडाकेबाजी खेळीमुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.