सचिन तेंडुलकर आणि शोएब अख्तर या दोन खेळाडूंमध्ये चालणारी जुगलबंदी प्रत्येक क्रिकेटप्रेमीने अनुभवली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलाच सामना रंगायचा. अनेकदा सचिनने शोएबची मैदानात धुलाई केली आहे. रावळपिंडी एक्स्प्रेस विरुद्ध मास्टर ब्लास्टर हा सामना मैदानावर नेहमी पाहण्यासारखा असायचा. शोएब अख्तरने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिनला पहिल्या भेटीदरम्यानची आपली आठवण सांगितली.

१९९९ साली कोलकाता कसोटी सामन्यात शोएब आणि सचिन पहिल्यांदा समोरासमोर आले होते. “मी सचिनबद्दल ऐकून होतो…त्याचा खेळ चांगला आहे मला माहिती होतं. पण सचिनला पहिल्यांदा पाहिल्यानंतर…हा देव आहे?? याची आता खैर नाही अशी भावना माझ्या मनात आली. मी त्याला ओळखत नाही आणि तो मला ओळखत नाही, तो आपल्या धुंदीत होता आणि मी माझ्या. मला त्याला पहिल्याच चेंडूवर बाद करायचं होतं, आणि नेमकं तसंच झालं.” ARY या पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शोएब अख्तरने ही आठवण सांगितली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर शोएब अख्तर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. भारतविरोधी वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून शोएब चांगलाच चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियात प्रस्तावित टी-२० विश्वचषक आयसीसीने रद्द केल्यामुळे शोएबने आयसीसीवर टीका करत बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आल्याचा आरोप केला होता. आयपीएल स्पर्धा झालीच पाहिजे, टी-२० विश्वचषक खड्ड्यात गेला तरी चालेल असा उपरोधिक टोला अख्तरने आयसीसीला लगावला होता.