‘वेगाचा अनभिषिक्त सम्राट’ असलेल्या जमैकाच्या उसेन बोल्टचा काही दिवसांपूर्वी दुखापतींनी पिच्छा पुरवला होता. त्या वेळी बोल्ट संपला, अशा वावडय़ा उठायला सुरुवात झाली होती. पण जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तीन सुवर्णपदकांना गवसणी घातली आणि या टीकाकारांना चोख उत्तर दिले. एवढय़ावरच तो थांबला नाही तर ‘‘मी संपलेलो नाही, सर्वाना चुकीचे ठरवत अधिक चांगली कामगिरी केली आहे,’’ अशी ताकीदच त्याने दिली
आहे.
‘‘या स्पर्धेत जसा चॅम्पियनसारखा खेळलो तसेच खेळायला मला आवडते. माझ्यासाठी ही कामगिरी उत्तम अशीच आहे. कारण हा मोसम माझ्यासाठी सोपा नव्हता. तरीही कामगिरीबाबत ज्यांना शंका होती, त्यांना त्याचे उत्तर मिळालेले आहे. मी इथे आलो आणि तीन पदके मिळवू शकलो याबद्दल आनंदी आहे,’’ असे बोल्ट म्हणाला.
या स्पर्धेत बोल्टने ४ बाय १०० मी. रिले, १०० मी. आणि २०० मी. या तीन स्पर्धामध्ये सुवर्णपदक पटकावत जमैकाच्या संघाचे उत्तमपणे नेतृत्व केले. तो पुढे म्हणाला की, ‘‘हा हंगाम खडतर होता, हे मी मान्य करतो. पुढील हंगाम असा नसावा, अशी मी अपेक्षा करतो. रिओ ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्यासाठी मी तयारी करीत आहे. त्यानंतरच मी माझ्या कारकीर्दीबाबत निर्णय घेईन.’’