पेटीतील एक आंबा नासका निघाला की, ती कीड इतर आंब्यांनाही लागते आणि सर्व आंबे नासतात, असे म्हणतात. याच धर्तीवर क्रिकेटला वाचवण्यासाठी वाईट खेळाडूंना बाहेर काढण्याची हीच वेळ असल्याचे मत दिल्ली पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी व्यक्त केले आहे. ‘‘क्रिकेट हा चांगला खेळ असला तरी तो सध्या नासत चालला आहे. त्याला वाचवण्यासाठी वाईट खेळाडूंना याच वेळी क्रिकेटमधून बाहेर काढा,’’ असे नीरज कुमार यांनी सांगितले.
नीरज कुमार यांचे दल सध्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या खेळाडूंसहित सट्टेबाजांवर आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे. ५९ वर्षीय कुमार यांची कारकीर्द जवळपास तीस वर्षांची असून यामध्ये त्यांनी बरीच मोठी प्रकरणे हाताळली आहे. स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी दोषींवर आरोपपत्र दाखल करताना ‘‘या स्पॉट-फिक्संगप्रकरणाने  लक्षावधी क्रिकेट चाहत्यांच्या विश्वासघात केला आहे.’’ असे ते म्हणाले.
जेव्हा हे प्रकरण माझ्यापुढे आले तेव्हा या खेळाच्या इतिहास तपासायला सुरुवात केली. त्यावेळी १९३२ सालचा एक संदर्भ मला समजला. त्यावेळी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरू होता. इंग्लंडचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर आखूड टप्प्यांच्या चेंडूचा मारा करत होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे कर्णधार बिल वूडफूल यांनी इंग्लंडचे संघ व्यवस्थापक यांना सांगितले की, ‘‘हा खेळ नासवण्यासाठी चांगला प्रयत्न केला जात आहे, पण ही वेळ आहे ती काही कलुषित लोकांना बाहेर काढण्याची.’’ त्यानुसारच आताच्या घडीला खेळ नासवणाऱ्या खेळाडूंना बाहेर काढायला हवे.
यावेळी सट्टेबाजांवर ‘मोक्का’ लावण्यात येण्याविषयी कुमार यांना विचारल्यावर ते म्हणाले की, ‘‘माझ्या आरोपपत्रांवर निर्णय न्यायालय देणार आहे. इथे जर सट्टेबाज दुबई आणि पाकिस्तानात बसलेल्या अंडरवर्ल्डच्या लोकांबरोबर भाव ठरवत असतील, तर हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार नाही का?’’