नागपूर जिल्हा कुस्तीगीर संघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ५९वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा नागपूर येथे ६ ते १० जानेवारीदरम्यान चिटणीस पार्कवर आयोजित करण्यात आली आहे, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. तीन दशकांनंतर प्रथमच ही स्पर्धा नागपूरमध्ये होणार आहे.

या स्पर्धेत ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ८६ किलो, ९७ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गटात ८६ ते १२५ किलो वजन गटात स्पर्धा होणार आहेत. यात राज्यातील ४४ जिल्हा संघटना सहभागी होणार आहेत. दररोज सरासरी २५० कुस्त्या होणार असून त्यासाठी १५०० ते २००० मल्लांना निमंत्रित करण्यात आले आहे. गादी आणि माती या विभागात या स्पर्धा होतील. यासाठी दोन गादीचे, तर एक मातीचा आखाडा तयार करण्यात येणार आहे.
गादी आणि माती विभागात प्रथम आलेल्यांमध्ये अंतिम सामना होईल व त्यातून ‘महाराष्ट्र केसरी’ निवडला जाईल. विजेत्याला चांदीची गदा व एक लाख रुपये रोख व उपविजेत्याला ५१ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येईल. तसेच विविध वजन गटांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी राज्यातून १२५ पंचांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रशिक्षक, व्यवस्थापक व इतर पदाधिकारी अशा एकूण १२०० प्रतिनिधींचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.
‘‘स्पर्धेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ऑलम्पिकपदक विजेते सुशीलकुमार यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे,’’ असे बावनकुळे म्हणाले. पत्रकार परिषदेला वध्र्याचे खासदार रामदास तडस यांच्यासह भाजपचे इतरही आमदार उपस्थित होते.