कसोटी सामन्याच्या पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉने सर्वांची मने जिंकली आहे. आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पृथ्वी शॉला पहिला कसोटी सामना कायम आठवणीत राहणार आहे. पृथ्वी शॉने आपले शतक वडिलांना समर्पित केले आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी पृथ्वीची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये पृथ्वी शॉने आपले शतक वडिलांना समर्पित केल्याचे सांगितले.

तो म्हणाला की, “हा माझ्यासाठी फक्त एक सामना होता. पुढच्या वेळीही माझा हाच विचार असेल. सामना सुरु होण्यापूर्वी मी निराश होतो. पण जसजसा मी खेळत गेलो तसतसा माझा आत्मविश्वास वाढत गेला. मी शतक झळकावले तेव्हा पहिल्यांदा मला माझ्या बाबांची आठवण आली. माझ्या या यशामध्ये वडिलांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या कठोर मेहनतीमुळे आज मी भारतीय संघाकडून खेळत आहे. त्यामुळे माझे पहिले शतक वडिलांना समर्पित करतो.”

‘ज्यावेळी मी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानावर गेलो त्यावेळी दडपणाखाली होतो. पण नंतर मी उत्सफुर्तपणे खेळ केला. आंतरराष्ट्रीय सामन्याचा दबाव मी वाढू दिला नाही. बाकी सामन्यासारखा सामना आहे असे मनाला सांगून उत्साहाने खेळ केला.’ असे पृथ्वी म्हणाला.

१८ वर्षीय मुंबईकर पृथ्वी शॉने १५४ चेंडूचा सामना करताना १९ चौकारांसह १३४ धावांची खेळी केली. या शतकी खेळीसह पृथ्वीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा पृथ्वी शॉ भारताचा १५वा खेळाडू ठरला. या आधी रोहित शर्माने ६ नोव्हेंबर २०१३ ला पदापर्पणात शतक झळकावले होते. त्याने १७७ धावा केल्या होत्या. योगायोग म्हणजे रोहीतनेही हा पराक्रम विंडीजविरुद्ध केला होता.

दरम्यान, अखेरच्या सत्रात कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ३०० धावसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा माघारी परतल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं. कोहली व रहाणे यांनी खेळाची गती कमी करत एक-एक धाव घेण्याकडे भर दिला. या खेळीदरम्यान कर्णधार विराट कोहलीने आपलं अर्धशतक साजरं केलं. मात्र दुसऱ्या बाजूने अजिंक्य रहाणेला ही किमया साधता आली नाही. ४१ धावांवर खेळत असताना अजिंक्य रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी संघाची फार पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात ३६४ धावांपर्यंत मजल मारली.