विश्वचषक काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना त्यासाठी तयारी करण्यासाठी भारतीय संघ आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी काही रणनीती आखली आहे. सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर आला असून यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धा असेल. त्यामुळे या मालिकेत प्रयोग करण्यासाठी चांगलाच वाव असून ही मालिका भारतासाठी प्रयोगशील असेल, असे संकेत धोनीने दिले आहेत.
‘‘वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकणे, हे आमचे सध्याचे ध्येय असेल. पण विश्वचषक काही महिन्यांवर आल्याने त्यासाठी तयारीही करावी लागणार आहे. त्यासाठी काही प्रयोग, काही बदल आम्ही या मालिकेमध्ये करणार आहोत. कारण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी आम्हाला काही गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या या मालिकेतच होऊ शकतील,’’ असे धोनी म्हणाला.
संघातील काही बदलांबाबत धोनी म्हणाला की, ‘‘मला व्यक्तिश: असे वाटते की, अजिंक्य रहाणे हा सलामीवीराची भूमिका समर्थपणे निभावू शकतो. त्यामुळे अजिंक्यला सलामीला पाठवून रोहितला मधल्या फळीत स्थान देता येऊ शकते. काही गोष्टी डोक्यामध्ये आहेत, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल.’’