करोना साथीमुळे मातब्बर संघांनी माघार घेतल्यामुळे ३ ऑक्टोबरपासून डेन्मार्क येथे होणारी थॉमस आणि उबर चषक बॅडमिंटन स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) घेतला आहे.

करोनाची साथ जगभरात नियंत्रणात येत नसल्यामुळे मार्चनंतर एकही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे थॉमस आणि उबर चषक या स्पर्धेनेच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पुन्हा सुरू होणार होते. या स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची निवडही घोषित करण्यात आली होती. मात्र इंडोनेशिया आणि दक्षिण कोरिया या बलाढय़ संघांनी करोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे माघार घेतल्यानंतर थायलंड, ऑस्ट्रेलिया, चायनीज तैपेई आणि अल्जेरिया या देशांनीही स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. ‘बीडब्ल्यूएफ’ने माघार घेतलेल्यांची जागा भरून काढण्यासाठी सिंगापूर आणि हॉँगकॉँग यांना आमंत्रित केले होते. मात्र या दोन्ही देशांनी करोनामुळे सहभाग घेण्यास नकार दिला. जपानही खेळण्याबाबत साशंक होता, तर चीन सरकारच्या परवानगीची वाट पाहत होते. या परिस्थितीमुळे महासंघाला स्पर्धा पुढे ढकलावी लागली.

‘‘माघार घेणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ होत असल्याने महासंघाला थॉमस आणि उबर चषक लांबणीवर टाकण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागत आहे. यावर्षी स्पर्धेचे आयोजन शक्य नसल्याने थेट पुढील वर्षीच स्पर्धा घेता येईल. सध्या पहिल्यासारखे उच्च दर्जाचे आयोजन शक्य नाही. त्यातच करोनामुळे प्रेक्षकांनाही प्रवेश देणे अशक्य आहे. करोनाच्या साथीमुळे प्रवास करण्यास अनेक जण घाबरत आहेत. परंतु सध्या आरोग्य हे सर्वाधिक महत्त्वाचे असल्याने माघार घेणाऱ्या संघांचाही आम्ही आदर करतो,’’ असे जागतिक बॅडमिंटन महासंघाने स्पष्ट केले.

सध्याच्या काळात डेन्मार्कला प्रवास करून थॉमस आणि उबर चषकात खेळणे कितपत सुरक्षित आहे, याबाबत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने चिंता व्यक्त केली होती. मात्र तरीदेखील सायना स्पर्धेत सहभागी होणार होती. सायनासह पी. व्ही. सिंधूचादेखील सहभाग होता. वास्तविक सिंधू या स्पर्धेत कौटुंबिक कारणास्तव खेळणार नव्हती. मात्र सिंधूवर भारताची भिस्त असल्याने अखेर तिचा सहभाग निश्चित करण्यात आला होता.

डेन्मार्क चषक ठरल्याप्रमाणेच

डेन्मार्क चषक बॅडमिंटन स्पर्धा मात्र नियोजित कार्यक्र मपत्रिके नुसारच १३ ते १८ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. डेन्मार्क मास्टर्स ही २० ते २५ ऑक्टोबरपासून होणारी स्पर्धा मात्र रद्द करण्यात आली आहे.

आशियाई देशांकडून घेण्यात आलेली माघार ही निराशाजनक आहे. त्या देशांमध्ये करोनाचा खूप मोठा संसर्ग नाही. तसेच स्थानिक कार्यक्रमदेखील मोठय़ा प्रमाणात होत आहेत. या स्थितीत आशियाई देशांनी स्पर्धेतून माघार घेणे हे बॅडमिंटनसाठी नुकसानीचे आहे.

– विमल कुमार, बॅडमिंटन प्रशिक्षक