भारतात पहिल्यांदाच होणाऱ्या थॉमसआणि उबेर चषकात भारतासमोर खडतर आव्हान आहे. आगेकूच करण्यासाठी भारताचा भर एकेरीच्या लढतींवर असेल. पुरुषांचा संघ एकेरी प्रकारातील कामगिरीवर अंतिम आठ संघांमध्ये वाटचाल करू शकतो, असे भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी सांगितले. थॉमस आणि उबेर चषकात एकेरीच्या तीन तर दुहेरीच्या दोन लढती होणार आहेत. थॉमस चषकात भारताच्या गटात मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जर्मनीचे आव्हान आहे.
‘‘एकेरीत आपला संघ बलवान आहे. एकेरीच्या तिन्ही लढतीत आपण विजय मिळवू शकू. एकेरीच्या खेळाडूंकडे बदल घडवण्याची क्षमता आहे. ली चोंग वेईसारख्या खेळाडूचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंना नमवता येऊ शकते. एकेरीप्रमाणे दुहेरीतही आपल्या संघात चांगले खेळाडू आहेत. दुहेरीच्या दोनपैकी एक लढत जिंकल्यास आपल्याला विजयाची सर्वोत्तम संधी आहे. मात्र त्यासाठी मलेशिया आणि कोरियाविरुद्ध प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मलेशिया आणि कोरिया दोन्ही मातब्बर संघ आहे. जर्मनीविरुद्ध भारताला चांगली संधी आहे. कोरियाविरुद्ध एकेरीच्या तीन लढती, मलेशियाविरुद्ध एकेरीच्या दोन तर दुहेरीच्या एका लढतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल तर जर्मनीविरुद्ध सर्वच लढतीत विजयाचे उद्दिष्ट
असेल,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले. उबेर चषकाविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘भारतीय महिला संघासमोर तुलनेने सोपे आव्हान आहे. भारताच्या गटात थायलंड, कॅनडा आणि हाँगकाँग हे संघ आहेत. सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू यांच्यासह अरुंधती परतावणे आणि पी.सी. तुलसी यांच्याकडून भारताला अपेक्षा आहेत. ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा ही अनुभवी जोडी दुहेरीची पहिली लढत खेळणार आहे. दुसऱ्या दुहेरीच्या लढतीतही आपल्याला विजयाची संधी आहे.’’ सायनाच्या फॉर्मविषयी ते म्हणाले, ‘‘तिच्या खेळात र्सवकष सुधारणेची आवश्यकता आहे. पण भारतात खेळण्याचा फायदा तिला मिळू शकतो.
आयबीएलमध्येही हेच स्वरूप होते, त्याचा फायदा खेळाडूंना मिळणार आहे.’’