News Flash

भारतीय संघात धोनीची जागा घेणं ही मोठी जबाबदारी – ऋषभ पंत

विंडीज दौऱ्यात ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने २ महिने क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचं ठरवलं आहे. विश्वचषकात पराभव स्विकारावा लागल्यानंतर धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चांना उधाण आलं, मात्र धोनीने अद्याप अधिकृतरित्या याबद्दल काहीही भाष्य केलं नाहीये. भारताच्या आगामी विंडीज दौऱ्यात यष्टीरक्षक म्हणून युवा खेळाडू ऋषभ पंतला संघात जागा देण्यात आली आहे. मात्र संघात धोनीची जागा घेणं ही मोठी जबाबदारी असल्याचं, ऋषभ पंतचं म्हणणं आहे. तो हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“भारतीय संघात धोनीची जागा घेणं ही मोठी जबाबदारी आहे. मात्र या गोष्टीचा आतापासूनच विचार करायला लागलो तर माझ्यासाठी सर्व गोष्टी कठीण होऊन बसतील. आता लोकं काय बोलतील याचा विचारच मला करायचा नाहीये, मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मला माझ्या देशासाठी खेळताना चांगला खेळ करायचा आहे. माझ्यासमोर हे मोठं आव्हान असणार आहे, पण मी ते स्विकारलं आहे. यातून मी काय शिकतो हे मला पहायचं आहे.” पंत धोनीची जागा घेण्याच्या प्रश्नावर बोलत होता.

धोनीला खेळाची चांगली जाण आहे. कोणत्या क्षणी सामना कोणत्या संघाकडे झुकतोय हे त्याला कळतं. अशा खडतर प्रसंगातही तो शांत राहून चांगले निर्णय घेतो. त्याचा हा गूण मला घ्यायचा आहे, पंतने धोनीचं कौतुक केलं. आगामी मालिकांमध्ये धोनीऐवजी ऋषभ पंत निवड समितीची पहिली पसंती असणार आहे. याची कल्पना धोनीला देण्यात आलेली आहे. भविष्यकाळातील महत्वाच्या स्पर्धांसाठी ऋषभ पंतला तयार करण्याचं काम धोनी करणार आहे. त्यामुळे आगामी विंडीज दौऱ्यात धोनीच्या अनुपस्थितीत पंत कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 9:24 am

Web Title: those are big shoes to fill says rishabh pant on taking place of ms dhoni in team psd 91
टॅग : Ms Dhoni,Rishabh Pant
Next Stories
1 मलिंगाला विजयी निरोप देण्यासाठी श्रीलंका उत्सुक
2 युवा तिरंगी क्रिकेट स्पर्धा : गर्गच्या शतकामुळे भारताचा विजय
3 भारत-वेस्ट इंडिज ‘अ’ संघांची कसोटी : पहिल्या दिवसावर भारत ‘अ’ संघाचे वर्चस्व
Just Now!
X