सुनील गावस्कर हा तर भारतीय क्रिकेटच्या नभांगणात तळपलेला एक तेजस्वी सूर्य. सचिन तेंडुलकरच्या कित्येक वर्षे आधी भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनावर आणि हृदयावर अधिराज्य गाजवणारा तो महानायक. भारतीयांना क्रिकेटचा लळा लावण्यात सलामीवीर फलंदाज गावस्कर यांचे योगदान मोठे. वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व असणाऱ्या युगात वेस्ट इंडिजच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर हेल्मेटशिवाय निधडय़ा छातीने सामोऱ्या जाणाऱ्या ‘लिटिल मास्टर’चे स्थान आजही भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनोमंदिरात अबाधित आहे. गावस्कर यांचे क्रिकेटमय दिवस आठवले की, त्यांचे फलंदाजीतील अनेक विक्रम चटकन डोळ्यांसमोर तरळतात. प्रत्येक विक्रमानंतर त्यांचे ते किंचित गालातल्या गालात स्मित.. खेळपट्टीवरील त्यांचा रुबाब.. त्याची खास ओळख बनलेली पनामा कॅप आणि हो, त्यांची एकमेव अशी ‘स्कल कॅप’ जी सध्या क्रिकेटच्या पंढरीतील जगप्रसिद्ध लॉर्ड्स म्युझियममध्ये सर्वाचे लक्ष वेधते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ खिसगणतीतही नव्हता, परंतु गावस्कर यांच्या अभिजात खेळीमुळे भारताकडे क्रिकेटजगत सन्मानाने पाहू लागले. १९७१ पासून १९८७ पर्यंत १६ वष्रे ‘सनी’च्या तेजाने क्रिकेट लखलखले. १९८३ मध्ये भारताने वेस्ट इंडिजचे वर्चस्व झुगारून विश्वचषक जिंकला. लॉर्ड्सच्या गॅलरीत कपिलदेव आणि गावस्कर यांनी उंचावलेल्या विश्वचषकाच्या आठवणींनी क्रिकेटरसिकांच्या मनात कायमचे घर केले आहे.
कसोटीमधील सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक सामने असे अनेक विश्वविक्रम गावस्कर यांनी प्रस्थापित केले. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर गावस्कर क्रिकेटविषयक कार्यातच रमून गेले. क्रिकेट समालोचन आणि क्रिकेट व्यवस्थापनात कार्यरत असलेली आपली कंपनी ते अनेक काळ सांभाळत आहेत. याशिवाय दरम्यानच्या काळात बीसीसीआयची तांत्रिक समिती, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखपद, आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्षपद, काही काळासाठी भारताचे प्रशिक्षकपद आणि आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे सदस्यत्वही त्यांनी सांभाळले आहे. या साऱ्या गोष्टी ध्यानात घेऊनच गावस्करांकडे सर्वोच्च न्यायालयानेही आयपीएलकरिता प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
भारतीय क्रिकेट एन. श्रीनिवासन आणि त्यांच्या साथीदारांनी डागाळले आहे. भारतीय क्रिकेटला आर्थिक रसद मिळवून देणाऱ्या आयपीएलच्या काळ्या बाजूच गेल्या सात वर्षांत प्रकाशझोतात आल्या आहेत. या स्पध्रेच्या शुद्धीकरणाची महत्त्वाची जबाबदारी गावस्करांकडे असणार आहे. आयपीएल प्रारंभीच्या काळात सुमारे दोन वष्रे गावस्कर प्रशासकीय समितीवर कार्यरत असताना अनेक महत्त्वाचे निर्णय स्पध्रेसंदर्भात घेण्यात आले, ज्यापैकी काही वादग्रस्त ठरले. इतकेच कशाला, गावस्कर यांना या पदाच्या मोबदल्यासाठीसुद्धा बीसीसीआयकडे भांडावे लागले होते. परंतु त्यांना अभिप्रेत असलेली रक्कम अद्याप मिळू शकलेली नाही. भारतीय क्रिकेटच्या कारभाराकडे पाहिल्यास सध्या श्रीनिवासन यांचेच एकछत्री साम्राज्य दिसते आहे. क्रिकेटपटू, प्रशासक, पदाधिकारी यांचे चेन्नई आणि इंडिया सीमेंट्शी असलेले संबंध जगजाहीर आहेत. आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रामन हेसुद्धा श्रीनिवासन यांचेच चेले. त्यामुळे या प्रतिकूल वातावरणात गावस्कर मुक्त आणि पारदर्शी कारभारानिशी आशेची बीजे रोवतील की श्रीनिवासनच्या नियंत्रणाखाली कठपुतली बाहुल्याप्रमाणे कार्य करतील, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
अर्थात गावस्कर यांच्याबाबत नकारात्मक विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण गेल्या काही महिन्यांत भारतीय क्रिकेटमधील चुकीच्या गोष्टींवर ते परखडपणे भाष्य करीत आहेत. कधी ते युवा फलंदाज विराट कोहलीच्या वृत्तीवर टीका करतात, कधी सराव टाळणाऱ्या खेळाडूंना धारेवर धरतात, कधी भारतीय क्रिकेट संघाच्या कार्यपद्धतीवर टीका करतात, कधी ‘मर्जी’तल्या खेळाडूंना जपण्याच्या प्रवृत्तीवर हल्ला चढवतात, तर कधी भारताचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या हकालपट्टीची मागणी करीत माजी कप्तान राहुल द्रविडला प्रशिक्षक करण्याची सूचना करतात. याशिवाय खेळाडूंचे हक्क आणि त्यांचे मानधन या संदर्भात गावस्कर नेहमीच सडेतोडपणे बाजू मांडतात. गावस्कर यांना दिलेल्या जबाबदारीतून सध्या तरी भारतीय क्रिकेटमध्ये नखशिखांत सुधारणा होणार नाहीत, कारण सर्वोच्च न्यायालयाने फक्त येत्या आयपीएलची धुरा त्यांच्याकडे सोपवली आहे. बीसीसीआयचा अन्य कारभार मात्र श्रीनिवासन यांच्याच तंबूतील माजी क्रिकेटपटू शिवलाल यादव यांच्याकडे आहेत. त्यामुळे गावस्कर यांची परीक्षा असेल ती फक्त  आयपीएलच्या स्वच्छतेची. गावस्कर यांच्याकडे सूत्रे देताना परस्परविरोधी हितसंबंधांच्या संघर्षांचीही नव्याने चर्चा झाली. कारण गावस्कर प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप ही क्रीडा विपणन कंपनी चालवतात. वीरेंद्र सेहवाग, वरुण आरोन आणि मनोज तिवारीसारख्या अनेक खेळाडूंचे व्यवस्थापन ही कंपनी पाहते. परंतु गावस्कर यांचा मान आणि भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान हे मोठे आहे. त्यामुळे वैयक्तिक गोष्टींना बाजूला ठेवून ते भारतीय क्रिकेटच्या हिताचा विचार करतील, असा विश्वास सर्वाना वाटतो आहे. काही महिन्यांची ही जबाबदारी. त्यासाठी समालोचनाचा करारही त्यांना भंग करावा लागला आहे, अर्थात त्याची भरपाई त्यांना मिळत आहे. पण हा तात्पुरता काळ संपल्यावर त्यांना पुन्हा बीसीसीआयचीच चाकरी करायची आहे. मुद्गल समितीच्या चौकशीनंतर श्रीनिवासन जरी हद्दपार झाले तरी, त्यांच्या कंपूतील अन्य पदाधिकारी आणि ‘कार्य’कर्ते मात्र शिल्लक राहतीलच. त्यामुळे गावस्कर यांना पुढे याच क्रिकेटधुरिणांसोबत वावरायचे आहे. या परिस्थितीत ते मोठे निर्णय घेऊ शकतील का, गावस्कर यांच्या विचारांतील आदर्शवत क्रिकेटव्यवस्था प्रत्यक्षात साकारू शकेल का, हा प्रश्नच आहे.