डाव्या पायावरील शस्त्रक्रियेमुळे आता आपली क्रिकेट कारकीर्द संपली की काय, अशी शंका माझ्या मनात आली होती, मात्र त्रिपुराविरुद्धच्या रणजी सामन्याद्वारे मिळालेली संधी ही माझ्यासाठी पुनरागमन सिद्ध करण्याची हुकमी संधी आहे, असे एस. श्रीशांत याने सांगितले.
आगरतळा येथे त्रिपुराविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो केरळचे प्रतिनिधित्व करीत आहे. शस्त्रक्रियेमुळे तो सहा महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहिला होता. तो म्हणाला, लागोपाठच्या शस्त्रक्रियांमुळे मी खूपच निराश झालो होतो. आता आपल्याला क्रिकेट खेळता येणार नाही असेच मला वाटले होते. जवळजवळ दोन महिने मी व्हीलचेअरवरच होतो. त्यामुळे चालणे म्हणजे काय हेच मी विसरून गेलो होतो. माझ्या पायात प्लॅटिनमचे स्क्रू बसविण्यात आले असले तरी गोलंदाजीचा सराव करताना मला त्रास झाला नाही.
आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमनाविषयी तो म्हणाला, आपल्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुन्हा खेळावयाचे आहे हेच ध्येय डोळय़ांसमोर ठेवत मी सराव करीत आहे. त्यामुळे दुखापतीमधून तंदुरुस्त होण्यास मला खूप फायदा होतो. ते स्वप्नच मी जगत आहे. माझ्या दुखण्यातून तंदुरुस्त होण्यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन व राष्ट्रीय क्रिकेट अकादमी यांचा मोठा वाटा आहे. दुखापतीमुळे मी कमी रनअप घेऊन गोलंदाजी करण्यावर भर देत आहे. त्यामुळे षटके टाकण्याचा माझा वेळ कमी झाला आहे. अजूनही ताशी १३५ ते १४० किलोमीटर वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता माझ्याकडे आहे.