रिओ येथे गतवर्षी झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर वेटलिफ्टिंग खेळास रामराम करण्याचा माझा मनोदय होता. मात्र घरच्यांचा आग्रहाखातर व प्रशिक्षकांनी दिलेल्या धीरामुळेच मी त्या निर्णयापासून परावृत्त झाले. त्यानंतर केलेल्या अथक परिश्रमामुळेच मी जागतिक सुवर्णपदक मिळवू शकले, असे जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत नुकतेच सुवर्णपदक मिळविणाऱ्या सैकोम मीराबाई चानू हिने सांगितले.

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत चानू हिने राष्ट्रीय उच्चांक नोंदवीत हे यश संपादन केले. २२ वर्षांनी भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. १९९५ मध्ये करनाम मल्लेश्वरी हिने सुवर्णपदक पटकाविले होते. रिओ येथे गतवर्षी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चानू हिला सपशेल अपयश आले होते. त्या वेळी समाज माध्यमांवर चानू व तिच्या प्रशिक्षकांवर भरपूर टीका करण्यात आली होती.

चानू म्हणाली, ही टीका एवढी होती, की आता आपण सराव थांबवावा व खेळातून निवृत्त व्हावे असेच मला वाटत होते. तथापि, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पुढच्या स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी करावयाची आहे असा निश्चय करीत मी खूप मेहनत करीत राहिले. त्याचीच फलश्रुती जागतिक सुवर्णपदकाद्वारे लाभली आहे.

रिओ स्पर्धेनंतर तिने क्लीन व जर्कमधील तंत्रात सुधारणा केली. तसेच तिने क्रीडा मानसतज्ज्ञांचीही मदत घेतली. मानसतज्ज्ञांचा आपल्या सुवर्णपदकात मोठा वाटा आहे, असे तिने आवर्जून सांगितले.

अमेरिकेतील स्पर्धेपूर्वी सराव शिबिरात ती नियमितपणे उत्तेजक चाचणी करून घेत होती. अमेरिकेत पोहोचल्यानंतरही तिने दोन वेळा चाचणी दिली. आपले यश निष्कलंक असले पाहिजे यावर तिचा भर असतो.