भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघात तीन बदल अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. वेगवान गोलंदाज उमेश यादवने दुखापतीमुळे माघार घेतली असल्याने त्याच्या जागी शार्दुल ठाकूर किंवा थंगारासू नटराजन यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकेल. तसेच मयांक अगरवाल आणि हनुमा विहारी यांच्या जागी अनुक्रमे रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांना संघात स्थान मिळू शकेल.

मेलबर्नला आत्मविश्वास उंचावणारा विजय संपादन केला असला तरी सिडनीच्या लढतीसाठी भारतीय संघात बदल अपेक्षित आहे. दुसऱ्या कसोटीत उमेशच्या पोटरीला दुखापत झाली आहे. त्यामुळे उर्वरित मालिकेलाच उमेश मुकणार असून, लवकरच तो मायदेशी प्रस्थान करील. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी शार्दुल किंवा नटराजनला संधी मिळू शकेल.

अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात दुखापत झालेल्या मोहम्मद शमीच्या जागी भारतीय संघात शार्दुलचा समावेश करण्यात आला आहे. ‘‘नटराजन तमिळनाडूकडून फक्त एकमेव प्रथम श्रेणी सामना खेळला आहे, तर शार्दुलकडे मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळण्याचा पुरेसा अनुभव गाठीशी आहे. त्यामुळे शार्दुलला प्राधान्य दिले जाण्याची शक्यत आहे,’’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.

शार्दुलने ६२ प्रथम श्रेणी सामन्यांत २०६ बळी मिळवले आहेत. दोन वर्षांपूवी्र वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचे पदार्पण दुर्दैवी ठरले होते. दुखापतीमुळे त्याला सामना अर्धवट सोडावा लागला होता. मेलबर्न कसोटीत मोहम्मद सिराजने यशस्वीपणे शमीची जागा घेतली आहे. उमेशच्या जागेसाठी नवदीप सैनीसुद्धा शर्यतीत आहे.

सलामीवीर मयांक अगरवाल आणि मधल्या फळीतील हनुमा विहारी पहिल्या दोन कसोटी सामन्यांत धावांसाठी झगडताना आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित शुभमन गिलच्या साथीने सलामीला उतरू शकेल, तर विहारीची जागा राहुल घेऊ शकेल. ‘‘ऑस्ट्रेलिया भूमीवर नुकतेच विलगीकरण पूर्ण करणाऱ्या रोहितचा सलामीसाठी किंवा पाचव्या क्रमांकासाठी विचार केला जाईल. रोहित मधल्या फळीत उतरल्यास राहुलला सलामीसाठी स्थान मिळेल.

१०० टक्के तंदुरुस्ती नसेल तरीही वॉर्नर खेळणार -मॅक्डोनाल्ड

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर १०० टक्के तंदुरुस्ती नसेल तरीही त्याला सिडनीत होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळवणार आहोत, अशी ग्वाही ऑस्ट्रेलियाचे साहाय्यक प्रशिक्षक अ‍ॅन्ड्रय़ू मॅक्डोनाल्ड यांनी दिली. मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीतून सावरणाऱ्या वॉर्नरच्या अनुपस्थितीत पहिल्या दोन कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. ‘‘वॉर्नर ९०-९५ टक्के तंदुरुस्त असतानाही देशासाठी खेळायला तयार असेल, तर आम्ही त्याला नक्की खेळवू,’’ असे मॅक्डोनाल्ड यांनी सांगितले.

रहाणेची सहाव्या स्थानी मुसंडी

‘आयसीसी’ कसोटी क्रमवारी

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) गुरुवारी प्रकाशित झालेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने पाच स्थानांनी मुसंडी मारताना सहावे स्थान प्राप्त केले आहे. दुसऱ्या कसोटीतील विजयात रहाणेने दोन्ही डावांत अनुक्रमे ११२ आणि नाबाद २७ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विननेही दोन स्थानांनी आगेकूच करताना गोलंदाजामध्ये सातवे स्थान मिळवले आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने नववे स्थान मिळवले आहे. मेलबर्न कसोटीत ५७ धावा आणि तीन बळी घेणाऱ्या रवींद्र जडेजाने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील तिसरे स्थान टिकवले आहे.