News Flash

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेपूर्वी भारताच्या तीन खेळाडूंना करोनाची लागण!

भारताच्या प्रशिक्षकाने व्यक्त केले आश्चर्य

आज बुधवारपासून ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचा प्रारंभ होत आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी भारतासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन भारतीय बॅडमिंटनपटूंना करोनाची लागण झाली असून, एक सहाय्यक कर्मचारी देखील करोना संक्रमित आढळला आहे. उर्वरित खेळाडूंचे अहवाल येणे बाकी आहे. करोनाची लागण झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालाबद्दल भारतीय प्रशिक्षक मॅथेस बो यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ”दोन आठवड्यांपूर्वी स्विस ओपन सुरू झाल्यापासून आम्ही ज्युरिखमध्ये क्वारंटाइन होतो. मागील 14 दिवसांत आमची 5 वेळा चाचणी झाली आहे आणि सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मग आता अचानक पॉझिटिव्ह कसे आलो?”

पी. व्ही. सिंधूवर भारताची भिस्त

या स्पर्धेमध्ये विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूवर भारताची भिस्त असेल. स्विस खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवातून सावरत जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी ती उत्सुक आहे. २०१९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर तिला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. पाचव्या मानांकित सिंधूची पहिली लढत मलेशियाच्या सोनिया चीहशी होणार आहे, तर उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकानी यामागुचीशी तिची गाठ पडेल. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाचा पहिल्या फेरीत सातव्या मानांकित डेन्मार्कच्या मिआ ब्लिशफेल्डशी सामना होणार आहे.

पुरुषांमध्ये श्रीकांत आणि कश्यपकडून अपेक्षा

पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतकडून भारताच्या पदकाच्या प्रमुख आशा आहेत. श्रीकांतची पहिली लढत इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोशी असेल, तर जागतिक कांस्यपदक विजेत्या बी. साईप्रणितला फ्रान्सच्या टॉमा ज्युनियर पुपोव्हशी भिडावे लागेल.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपची पहिली लढत जागतिक क्रमवारीत अग्रक्रमांकावर असलेल्या केंटो मोमोटाशी होईल. एच. एस. प्रणॉयचा पहिला सामना मलेशियाच्या डॅरेन लीवशी, तर समीर वर्माचा वायगॉर कोएल्होशी होणार आहे. पुरुष दुहेरीत जागतिक पुरुष दुहेरी क्रमवारीत सध्या १०व्या स्थानावर असलेल्या सात्त्विक साईराज रन्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यावर भारताची मदार असेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:49 pm

Web Title: three indian shuttlers tests corona positive just before all england badminton championship adn 96
Next Stories
1 बिली जीन किंग कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा
2 टी-20 मालिका : इंग्लंडविरुद्धचा पराभव ‘या’ तीन कारणांमुळे!
3 Road Safety World Series: आज सचिन-लारा सेमीफायनलमध्ये भिडणार
Just Now!
X