अर्जुन पुरस्कार विजेत्या गौरव गिलच्या कारने शनिवारी राष्ट्रीय कार रॅली अजिंक्यपद स्पर्धेत तिघांना उडवल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. गिलला जबर दुखापत झाली असली तरी त्याची प्रकृती स्थिर आहे.

राजस्थानमधील बरमेर येथे एफएमएससीआय भारतीय राष्ट्रीय कार रॅली स्पर्धेची तिसरी फेरी सुरू आहे. शनिवारी पहिल्या टप्प्यात गौरव गिलची कार आघाडीवर असताना एका वळणावर त्याच्या कारने मोटारसायकलला ताशी १४५ किमीच्या वेगाने धडक दिली. या धडकेत नरेंद्र, पत्नी पुष्पा आणि त्यांचा मुलगा जितेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ही शर्यत रद्द करण्यात आली. गौरवने ब्रेक मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण वेगामुळे त्यांचा जीव वाचवणे शक्य झाले नाही, असे स्पर्धेचे संयोजक वम्सी मेरला यांनी सांगितले.

‘‘१५ दिवस हा रस्ता गावकऱ्यांसाठी बंद असल्याचा इशारा वारंवार देण्यात येत होता. नरेंद्र यांचे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांशी भांडण झाले; पण सुरक्षारक्षकांची नजर वळवून ते रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यातच ही दुर्दैवी घटना घडली. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या,’’ असे एफएमएससीआयचे अध्यक्ष जे. पृथ्वीराज यांनी सांगितले.