जागतिक अजिंक्यपद पॅराअ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरत सुंदर सिंह गुर्जरने पुरुषांच्या एफ ४६ भालाफेक प्रकारातील जागतिक पॅराअ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद टिकवले. सुंदरसह कांस्यपदक विजेत्या अजित सिंग आणि रिंकू यांनी टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील स्थान निश्चित केले आहे.

सुंदरने हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करताना ६१.२२ मीटर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. अजितने ५९.४६ मीटर अंतरासह कांस्यपदक प्राप्त केले, तर रिंकूला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

२३ वर्षीय सुंदर हा दोन जागतिक पदके जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. सुंदरने २०१७ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. देवेंद्र झाझरियाने २०१३ च्या जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्ण आणि २०१५ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. पाचव्या प्रयत्नापर्यंत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या सुंदरने सहाव्या प्रयत्नात ६१.२२ मीटर भाला फेकून श्रीलंकेच्या दिनेश हेराथ मुदियानसेलागेला मागे टाकून अग्रस्थान गाठले.

आंतरराष्ट्रीय पॅराअ‍ॅथलेटिक्स समितीच्या नियमानुसार जागतिक पॅराअ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमधील प्रत्येक वैयक्तिक पदकांच्या क्रीडा प्रकारातील अव्वल चार खेळाडू पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरतात. याला अपवाद असणाऱ्या मॅरेथॉन प्रकारात मात्र प्रत्येक देशाला एक स्थान दिले जाते. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले आहे.

भालाफेकपटूंनी नेहमीच भारताला यश मिळवून दिले आहे. २०२०च्या टोक्या पॅरालिम्पिक स्पर्धेतही वर्चस्व गाजवू शकू, असा विश्वास प्रकट करणारी कामगिरी भारतीय खेळाडूंनी दाखवली आहे.

-गुरशरण सिंग, भारतीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष