इंग्लंडच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या दोन दिवस आधी संघाचे तीन खेळाडू आणि चार सहाय्यक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. ८ जुलैपासून उभय संघांत एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. करोनाने संघात शिरकाव केला असला, तरी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ही मालिका वेळापत्रकानुसार होईल, असे सांगितले आहे. बेन स्टोक्स संघात परतला असून त्याला एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही मालिकांसाठी संघाची कमान देण्यात आली आहे.

ईसीबीने सांगितले, ”करोना संक्रमित आढळलेले खेळाडू प्रोटोकॉलनुसार ४ जुलैपासून सेल्फ आयसोलेशनमध्ये असतील. संघातील अन्य खेळाडूदेखील त्यांच्या संपर्कात आले आहेत. अशा परिस्थितीत तेसुद्धा क्वारंटाइन असतील. बेन स्टोक्स संघात पुनरागमन करत असून त्याला कर्णधार बनविण्यात आले आहे.” या दौर्‍यावर पाकिस्तान संघाला तीन एकदिवसीय मालिका आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.

 

हेही वाचा – विम्बल्डन : रॉजर फेडररची १८व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत धडक

ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन म्हणाले, “आम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल, की डेल्टा व्हेरिएंटच्या सुरूवातीस बायो बबलच्या विश्रांतीनंतर धोका वाढला आहे. आम्ही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांच्या सुधारणेसाठी प्रोटोकॉलचा नियम बनविला आहे. गेल्या १४ महिन्यांत प्रत्येकाने पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही या मालिकेसाठी आणखी एक संघ तयार करत आहोत.”

भारताला खेळायचीय कसोटी मालिका

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड या मालिकेसाठी नवीन संघ जाहीर करेल. ८, १० आणि १३ जुलै रोजी एकदिवसीय सामने होणार आहेत. त्याचबरोबर १६, १८ आणि २० जुलै रोजी टी-२० सामने खेळले जातील. अलीकडे इंग्लंडविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर श्रीलंकेचा संघ घरी परतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.