तीन वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सने यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पहिला विजय मिळवला असून, सोमवारी ही विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहे.

चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघांना यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात अपयश आले. चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हार पत्करली, पण त्यातून सावरत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने पंजाब किंग्जविरुद्ध दिमाखदार विजयाची नोंद केली. दीपक चहरने या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. दुसरीकडे, राजस्थानने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अखेरच्या षटकात निसटता विजय मिळवला.

चेन्नई सुपर किंग्ज एन्गिडीमुळे बळ?

चेन्नईकडून दीपक चहरला सॅम करन, शार्दूल ठाकूर यांच्याकडून अपेक्षित साथ मिळत नाही. विलगीकरण संपलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीचा वेगवान माऱ्यात समावेश झाल्यास चेन्नईला फायदेशीर ठरेल. इंग्लंडचा अष्टपैलू मोईनकडेही चेन्नईला तारण्याची क्षमता आहे. फॅफ डय़ू प्लेसिसने नाबाद ३६ धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडू मात्र धावांसाठी झगडत आहेत. धोनीकडूनही अपेक्षित धावा होत नाहीत. सुरेश रैनामुळे चेन्नईच्या फलंदाजीला बळ मिळाले आहे.

राजस्थान रॉयल्स मिलर-मॉरिसवर भिस्त

कर्णधार संजू सॅमसनने सलामीच्या सामन्यात पंजाबविरुद्ध एकहाती झुंज दिली. सॅमसनसह जोस बटलर आणि डेव्हिड मिलरची फलंदाजी राजस्थानसाठी मोलाची ठरली. दिल्लीविरुद्ध आघाडीची फळी कोसळल्यानंतर मिलर आणि ख्रिस मॉरिस यांनी डाव सावरला. अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि युवा चेतन सकारियानेही महत्त्वाचे योगदान दिले.