करोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावानंतर जगभर असुरक्षित वातावरण निर्माण झाले असतानाच डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमेयर आणि किमो पॉल या वेस्ट इंडिजच्या तीन खेळाडूंनी पुढील महिन्यात होणाऱ्या तीन कसोटी मालिके च्या दौऱ्यासाठी इंग्लंडमध्ये जाण्यास नकार दर्शवला आहे.

ब्रिटन सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने या दौऱ्यासाठी १४ सदस्यीय संघाची घोषणा केली. ‘‘डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमेयर आणि किमो पॉल यांनी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास अनुत्सुकता दर्शवली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ त्यांच्या निर्णयाचा आदर करते. दौऱ्यावर जाण्यास नकार देणाऱ्या खेळाडूंचा भविष्यातील संघनिवडीसाठी विचार करण्यात येणार नाही, याची कल्पना आधीच देण्यात आली होती,’’ असे मंडळाच्या पत्रकात म्हटले आहे.

वेस्ट इंडिज मंडळाने त्यांनी माघार घेतल्याचे कारण मात्र स्पष्ट केलेले नाही. या दौऱ्यासाठी खेळाडूंच्या आरोग्याचे, सुरक्षिततेचे आश्वासन मिळाल्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ या दौऱ्यावर जाणार आहे.