विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीइतकीच उत्सुकता स्पेन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या मुकाबल्याची होती. याच दोन संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकाचा अंतिम मुकाबला खेळला गेला होता. आंद्रेस इनिएस्टाने निर्णायक गोल करत स्पेनला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. या पराभवाची परतफेड म्हणून या सामन्याकडे पाहिले जात होते आणि घडलेही तसेच. गुणसंख्या पाहिली तर नेदरलँड्सचे दणदणीत वर्चस्व जाणवते. शेरास सव्वाशेर खेळाडूंमधील द्वंद्व अनुभवण्यासाठी जगभरातले फुटबॉलरसिक सज्ज झाले होते. मात्र त्यांना केवळ नेदरलँड्सच्या अभ्यासपूर्ण खेळाची अनुभूती जाणवली. एकतर्फी विजय नोंदवत नेदरलँड्सने गृहपाठ चोख केला असल्याचे सिद्ध केले आहे. स्पेनच्या डावपेचांचा आधार म्हणजे ‘टिकी-टाका’. सातत्याने आक्रमणाऐवजी चेंडूवर नियंत्रण राखत, छोटे-छोस्थानावर हल्लाबोल करत त्यांना निष्प्रभ केले. ‘टिकी-टाका’ पद्धतीमधील त्रुटी हेरून नेदरलँड्सने त्यानुसार आक्रमण केले आणि त्याचे गोड फळ त्यांना दीड तासांतच मिळाले.
नेदरलँड्सने संपूर्ण सामन्यात एरियल अर्थात चेंडू हवेतच खेळवत गोल करण्याकडे सगळा भर दिला. दुसरीकडे स्पेन मात्र आपल्या ‘टिकी-टाका’नुसार जमिनीलगत फटक्यांसाठी प्रयत्न करत होता. आक्रमणात असलेला चेंडू बचाव प्रक्रियेत जाण्याचा काळ महत्त्वाचा असतो. स्पेनकडून चेंडूवर नियंत्रण मिळवून, तो हवेतल्या फटक्यांद्वारे आपल्या खेळाडूंमध्ये खेळवत गोलपोस्टच्या दिशेने नेण्याचे नेदरलँड्सची रणनीती पुरेपूर यशस्वी ठरली. स्पेनतर्फे झेव्ही अलोन्सोने गोल केला, मात्र स्पेनच्या आघाडीचा जराही परिणाम नेदरलँड्सच्या खेळावर जाणवला नाही. नेदरलँड्सचे प्रशिक्षक व्हॅन गाल यांनी अतिशय विचारपूर्वक योजना आखल्या होत्या आणि या योजना प्रत्यक्ष मैदानावर उतरवत खेळाडूंनी बाजी मारली.
आर्येन रॉबेन आणि रॉबिन व्हॅन पर्सी हे नेदरलँड्सचे हुकमी एक्के. मोहीम फत्ते करत या दोन खेळाडूंनी संघव्यवस्थापनाचा त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. या दोघांच्या झंझावातापुढे स्पेनचे रथीमहारथी खेळाडूही नामोहरम ठरले. नेदरलँड्सच्या अन्य खेळाडूंपेक्षाही या दोघांचे चेंडूवरचे वर्चस्व अद्भुत असे होते. स्पेनच्या बचावातल्या उणिवा त्यांनी नेमकेपणाने टिपल्या होत्या. हवाहवाई तंत्र राबवताना, स्पेनच्या बचावपटूंना चकवत चेंडूवर नियंत्रण मिळवून, तो त्वरेने खेळवत गोल करणे अपवादात्मक कौशल्य आहे. आर्येन आणि व्हॅन पर्सी या द्वयीने नेदरलँड्सला जिंकून द्यायचेच असा पण करत खेळ केला. स्पेनचा गोलरक्षक आयकर कॅसिल्ला जगातल्या सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक आहे. मात्र आर्येन आणि व्हॅन पर्सी यांनी सातत्याने कॅसिल्लालाच लक्ष्य केले. कॅसिल्लाला त्याच्या परिघातून बाहेर काढून चकवण्याचे त्यांचे तंत्र अव्वल दर्जाचे होते. कॅसिल्लाचा अतिआत्मविश्वास नडला की, त्याला आपल्या बचावपटूंची साथ मिळाली नाही, याचा विचार स्पेनच्या संघव्यवस्थापनाने करायला हवा. कौशल्याला अचूक अभ्यासाची जोड दिली तर काय किमया होऊ शकते, याचा प्रत्यय नेदरलँड्सने दिला.
स्पेनचे प्रशिक्षक डेल बॉस्के यांनी अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. त्यांनी खेळवलेला संघही ताकदवान असाच होता, मात्र नेदरलँड्सकडून असा झंझावाती खेळ होईल याची त्यांना कल्पना नसल्याचे स्पष्ट जाणवले. गतविजेत्या स्पेनला हा पराभव जिव्हारी लागणारा आहे, मात्र यामुळे सर्व काही संपलेले नाही. या पराभवानंतरही ते जेतेपदाचे दावेदार आहेत. पुढच्या लढतीत ते नव्या ऊर्जेने खेळतील याची खात्री आहे. नेदरलँड्सला नेहमी नशिबाने हुलकावणी दिली आहे. यंदा इतिहास घडवायचा असेल तर त्यासाठीची आदर्श सुरुवात त्यांनी या विजयाद्वारे केली आहे.