रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाहीये. सलामीच्या सामन्यात बडोद्यावर मात केल्यानंतर मुंबईला घरच्या मैदानावर रेल्वे आणि कर्नाटकविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर मुंबईच्या खराब कामगिरीवर सर्व स्तरातून टीका होते आहे. अशा परिस्थितीमध्ये माजी मुंबईकर खेळाडू दिलीप वेंगसरकर आणि अमोल मुझुमदार यांनी, आता संघासाठी काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे असं मत व्यक्त केलंय.

“मुंबईची फलंदाजी नेमकी का ढेपाळली याचं नेमकं कारण सांगणं खरंतर कठीण आहे. गेली अनेक वर्ष फलंदाजी हा मुंबईच्या संघाचा कणा राहिलेला आहे. माझ्या मते आता काही बदल करण्याची वेळ आलेली आहे. कोणीही संघातली आपली जागा कायम राहिलं असं मानू नये. मी संपूर्ण संघच बदला असं म्हणत नाहीये…पण काही खेळाडूंना नक्कीच बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल.” वेंगसरकर इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राशी बोलत होते.

अवश्य वाचा – बाप रे बाप ! रणजी सामन्यादरम्यान मैदानात शिरले दोन साप

मुंबई क्रिकेट देशाला सुनिल गावसकर, अजित वाडेकर, सचिन तेंडुलकर, वासिम जाफर, दिलीप वेंगसरकर, अमोल मुझुमदार असे काही सर्वोत्तम फलंदाज दिले आहेत. टीम इंडियाचा वन-डे संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा आणि कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे हे देखील मुंबईचेच आहेत. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये काही ठराविक फलंदाजांचा अपवाद वगळता मुंबईच्या फलंदाजांची कामगिरी चांगली झालेली नाही.

अवश्य वाचा – Ranji Trophy : घरच्या मैदानावर मुंबईचा दुसरा पराभव, कर्नाटक ५ गडी राखून विजयी 

या हंगामातली मुंबईची फलंदाजी ही भीषण आहे, पण मी सकारात्मक आहे. ड्रेसिंग रुममध्ये अजुनही काही खेळाडू आहेत ज्यांना मैदानात संधी द्यायला हवी, मात्र त्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. आणि एखाद-दुसरा कठोर निर्णय घेतल्यामुळे जगाचा अंत होणार नाहीये. याआधीही मुंबईच्या संघासाठी कठोर निर्णय घेतले गेले आहेत, मात्र हे सर्व आता निवड समितीवर अवलंबून आहे, मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुझुमदारने आपलं मत मांडलं.

यादरम्यान वेंगसरकर यांनी २३ वर्षाखालील मुंबईतील खेळाडूंना संधी देण्याचं मत मांडलं, तर अमोल मुझुमदारनेही दुखापतग्रस्त पृथ्वी शॉला सामना अर्धवट सोडून NCA मध्ये पाठवण्याच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. सामना संपवणं ही पृथ्वी शॉची जबाबदारी होती, त्यामुळे असं वागणं योग्य नव्हतं असं मुझुमदार म्हणाला. दरम्यान मुंबईचा पुढचा सामना तामिळनाडूविरुद्ध रंगणार आहे.