06 March 2021

News Flash

क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर झालेल्या वादविवादांनी महिला क्रिकेट ढवळून निघाले होते

(संग्रहित छायाचित्र)

न्यूझीलंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजचे प्रतिपादन

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर मिताली राज विरुद्ध हरमनप्रीत कौर आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यात बराच वादंग माजला. पण न्यूझीलंड दौऱ्यासाठी आता मिताली राजकडेच एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आल्याचे मितालीने सांगितले.

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर झालेल्या वादविवादांनी महिला क्रिकेट ढवळून निघाले होते. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मितालीला वगळण्यात आल्यानंतर भारतीय संघ पराभूत झाल्याने या वादाला तोंड फुटले होते. मितालीने या संपूर्ण प्रकाराबद्दल प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर तोफ डागल्याने बरीच उलथापालथ झाली. दोघांनी भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) पत्र लिहून त्यांचे म्हणणे मांडले होते. अखेरीस बीसीसीआयच्या निवड समितीने मितालीवर विश्वास दाखवत तिला न्यूझीलंडविरुद्धच्या स्पर्धेसाठी एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

त्या पार्श्वभूमीवर मितालीने सांगितले की, ‘‘या वादामुळे प्रत्येकावर काही ना काही परिणाम झाला. ते काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या पालकांसाठी खूप तणावपूर्ण होते. मात्र, आता त्यानंतर काही काळ गेल्याने सारे काही सुरळीत व्हायला लागले आहे, असे मला वाटते. तसेच आता सकारात्मकपणे पुढे बघायला हवे, असे मला वाटते.’’

हरमनप्रीतशी झालेल्या वादविवादानंतर आता तुमचे सूर जुळणे कितपत शक्य आहे, या विषयावर तिने मोघम उत्तर दिले. ‘‘जेव्हा १५ खेळाडू आणि प्रशिक्षकांचा लवाजमा एकत्र असतो, त्यावेळी ते एक कुटुंब बनलेले असते. कोणत्याही मोठय़ा कुटुंबात प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार पटतातच असे नाही. प्रत्येकाचे विचार भिन्न असतात. मात्र, वैचारिक भेद हे प्राधान्य नाहीत. आम्ही जेव्हा मैदानावर असू तेव्हा आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. याची आम्हा दोघींनाही जाण आहे. आम्ही यापूर्वी २००७ साली न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्या वेळच्या संघातील केवळ मी आणि झुलनच आहोत. अन्य सर्व खेळाडूंसाठी हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. त्यामुळे सांघिक भावनेने अधिकाधिक चांगला खेळ करण्याला महत्त्व आम्ही देणार आहोत,’’ असेही मितालीने नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 1:43 am

Web Title: time to focus on cricket
Next Stories
1 कोडे उलगडले..
2 पाकिस्तानच्या आर्थिक नुकसानीस अध्यक्ष नजम सेठी कारणीभूत
3 जय बिश्तचे शानदार शतक
Just Now!
X