जगभरासह भारतात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन युएईत केलं. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात पार पडलेल्या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआय लगेचच आगामी हंगामाच्या तयारीला लागलं आहे. २०२१ साली होणारं आयपीएल हे भारतामध्येच आयोजित करण्याचा विचार BCCI करत आहे. करोनाची परिस्थिती पाहता बीसीसीआयने स्पर्धेसाठी Bio Secure Bubble निर्माण करण्याची तयारी दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आणखी दोन संघ सहभागी होणार अशा बातम्या समोर येत होत्या. परंतू BCCI ने ही शक्यता फेटाळून लावली आहे.

अवश्य वाचा – कमाईमध्येही धोनीच किंग ! IPL मधून आतापर्यंत कमावलेत कोट्यवधी रुपये, आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

“२०२१ साली नवीन दोन संघांना स्पर्धेत सहभागी करुन देण्यासाठी खूप कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. निवीदा काढणं, खेळाडूंचा लिलाव आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेच्या आयोजनाशी निगडीत सर्व घटकांची यासाठी संमती मिळवणं….इतक्या कमी कालावधीत या गोष्टी होणं आव्हानात्मक आहे. आमच्यामते २०२२ च्या हंगामात नवीन संघांना सहभाग दिला जाऊ शकतो.” InsideSport शी बोलताना BCCI च्या अधिकाऱ्याने माहिती दिली.

अवश्य वाचा – स्टम्पमागे धोनी सल्ला देण्यासाठी नसल्यामुळे फिरकीपटूंची कामगिरी खालावतेय – किरण मोरे

आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क मिळालेल्या Star Sports कंपनीसोबत बीसीसीआयचा करार २०२१ पर्यंत आहे. त्यामुळे २०२२ साली बीसीसीआयला सामन्यांच्या प्रक्षेपणाच्या हक्कासाठी नव्याने निवीदा काढाव्याच लागणार आहेत. त्यामुळे २०२२ साली नवीन संघांना संधी दिल्यास, ब्रॉडकास्टिंग राईट्स आणि स्पर्धेची ब्रँड व्हॅल्यू वाढण्यात मदत होईल असं मत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केलंय. परंतू याबद्दल अंतिम निर्णय हा वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला जाणार आहे.