वरिष्ठ गटाच्या आशियाई मैदानी स्पर्धेतील सोनेरी कामगिरीनंतर टिंटू लुका पुढील वर्षी माझे अपुरे राहिलेले ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकारणारच, असा आत्मविश्वास माजी ऑलिम्पिकपटू पी.टी.उषा यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. टिंटू हिने वुहान (चीन) येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेतील आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
उषा यांच्या अ‍ॅथलेटिक्स अकादमीत सराव करणाऱ्या टिंटू हिने यापूर्वी रिले शर्यतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकले आहे. मात्र आठशे मीटर शर्यतीत अनेक वेळा तिला सोनेरी यशापासून वंचित राहावे लागले होते. वुहान येथील स्पर्धेत तिने पहिलेच सुवर्णपदक मिळविले. त्याबाबत उषा म्हणाल्या, टिंटू हिला आता लय सापडली आहे. या शर्यतीत चीनच्या खेळाडूंचे मोठे आव्हान होते. मात्र तिने त्याचे कोणतेही दडपण घेतले नाही व जिद्दीने हे यश मिळविले.
टिंटू हिला या स्पर्धेत ऑलिम्पिक स्पर्धेसाठी असलेली दोन मिनिटे एक सेकंद ही पात्रता वेळ नोंदविता आली नाही. त्याविषयी उषा यांनी सांगितले, या शर्यतीच्या वेळी खूप पाऊस पडत होता. तिला शर्यतीपूर्वी सरावदेखील करता आला नव्हता. त्यामुळे या पावसाचे तिच्यापेक्षा माझ्यावरच अधिक दडपण होते. वुहान येथे तिला ऑलिम्पिक पात्रता वेळ नोंदविता आलेली नसली तरी त्याची काळजी मी करीत नाही. या शर्यतीत असलेला एक मिनिट ५९.१७ सेकंद हा राष्ट्रीय विक्रम तिच्याच नावावर आहे. ऑगस्टमध्ये बीजिंग येथे जागतिक स्पर्धा होणार आहे. तेथे एक मिनिट ५९ सेकंदांपेक्षा ती कमी वेळ नोंदविणार याची मला खात्री झाली आहे.
ऑलिम्पिकमध्ये तिला पदकासाठी प्रामुख्याने कोणाचे आव्हान असेल विचारले असता उषा यांनी सांगितले, आशियाई स्तरावर तिला तुल्यबळ स्पर्धक नाही हे सिद्ध झाले आहे. आता रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला प्रामुख्याने जमेका व काही युरोपियन स्पर्धकांचे आव्हान असणार आहे. तरीही या आव्हानास ती यशस्वीरीत्या सामोरे जाईल अशी मला खात्री आहे.