20 September 2020

News Flash

जागतिक मैदानी स्पर्धा : टिंटू लुकाची ऑलिम्पिकवारी पक्की

भारताच्या टिंटू लुकाला जागतिक मैदानी स्पर्धेत ‘कहीं खुशी, कहीं गम’ची अनुभूती आली. ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उपांत्य फेरी गाठण्यात लुकाला अपयश आले,

| August 27, 2015 02:53 am

भारताच्या टिंटू लुकाला जागतिक मैदानी स्पर्धेत ‘कहीं खुशी, कहीं गम’ची अनुभूती आली. ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उपांत्य फेरी गाठण्यात लुकाला अपयश आले, परंतु तिने ऑलिम्पिकमधील प्रवेश मात्र निश्चित केला.
२६ वर्षीय लुकाने ही शर्यत २ मिनिटे ०.९५ सेकंदांत पार करीत पहिल्या प्राथमिक फेरीत सातवे स्थान मिळवले. प्रत्येक प्राथमिक फेरीतील पहिले तीन खेळाडूच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. आशियाई विजेती व राष्ट्रीय विक्रम नोंदविणारी खेळाडू लुकाची एक मिनिट ५९.१७ सेकंद ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आहे. तिला ही वेळ नोंदविता आली नाही, मात्र २ मिनिटे १ सेकंद या ऑलिम्पिक पात्रता वेळेपेक्षा कमी वेळ नोंदवत तिने रिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले.
लुकाने प्राथमिक फेरीतील ४०० मीटर धावण्याची पहिली फेरी ५७.०६ सेकंदांत पार करीत आघाडी मिळविली होती, मात्र नंतर तिला अपेक्षेइतका वेग ठेवता आला नाही. शेवटच्या २०० मीटर अंतरात अन्य सहा धावपटूंनी तिला मागे टाकले. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये लुकाला अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. जागतिक स्पर्धेत लुका हिने दुसऱ्यांदा भाग घेतला आहे. २०११मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या स्पर्धेत तिला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली होती. यंदा तिला प्राथमिक फेरीत बेलारुसची मरिना अर्झामासोव्हा (एक मिनिट, ५८.६९ सेकंद), इंग्लंडची लिन्से शार्प (एक मिनिट, ५८.९८ सेकंद), २००९ची विश्वविजेती कास्टर सेमेन्या (एक मिनिट, ५९.५९ सेकंद) यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. या तिन्ही खेळाडूंनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
केनियाचे दोन खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी
विश्व अजिंक्यपद स्पध्रेच्या आधी झालेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत केनियाचे दोन खेळाडू अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय हौशी अ‍ॅथलेटिक्स महासंघाने दिली. कोकी मानुंगा आणि जॉयसे झकारी यांच्या घेण्यात आलेल्या नमुन्यांतर्गत त्यांनी उत्तेजकांचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे. झकारीने महिलांच्या ४०० मीटर शर्यतीच्या पहिल्या फेरीत ५०.७१ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. तर मानंगाने ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत ५८.९६ सेकंद अशी वेळ नोंदवली होती.
स्टिपलचेस शर्यतीत ललिता आठवी
बीजिंग : महाराष्ट्राच्या ललिता बाबरला जागतिक मैदानी स्पर्धेतील तीन हजार मीटर स्टिपलचेस शर्यतीत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या शर्यतीत ललिताने सुरुवातीला चांगली मुसंडी मारली होती, मात्र नंतर तिचा वेग कमी पडला आणि ती मागे पडली. तिने हे अंतर ९ मिनिटे, २९.६४ सेकंदांत पार केले.भारताच्या ललिताच्या कामगिरीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. जागतिक स्पर्धेत ती प्रथमच भाग घेत होती. तिने उपान्त्य फेरीत ९ मिनिटे, २७.८६ सेकंद वेळ नोंदवत स्वत:चा ९ मिनिटे, ३४.१३ सेकंद हा राष्ट्रीय विक्रम मोडला होता. या पाश्र्वभूमीवर अंतिम फेरीत ती आणखी चांगली वेळ नोंदवणार, अशी अपेक्षा होती. मात्र अंतिम फेरीत तिच्यावर दडपण आले होते. या शर्यतीत अंतिम फेरी गाठणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. ललिताने सुरुवातीला चांगला वेग ठेवत एक हजारमीटरचा पहिला टप्पा ३ मिनिटे, ९.९६ सेकंदांत पार केला. नंतरच्या टप्प्यात तिचा वेग थोडासा कमी झाला. दोन हजार मीटरचे अंतर पार करण्यास तिला ६ मिनिटे, २२.२७ सेकंद वेळ लागला. शेवटच्या टप्प्यात तिला अपेक्षेइतका वेग वाढविता आला नाही.
उत्कंठापूर्ण झालेल्या या शर्यतीत केनियाच्या हेवीन कियेग जेपकेपोईने ही शर्यत ९ मिनिटे, १९.११ सेकंदांत पार करीत सोनेरी कामगिरी केली. टय़ुनिशियाच्या घिरीबी हबिबाने हे अंतर ९ मिनिटे, १९.२४ सेकंदांत पूर्ण केले आणि रौप्यपदक मिळवले. इंग्लंडच्या गेसा फेलिसिटासला कांस्यपदक
मिळाले. तिने हबिबाच्या पाठोपाठ केवळ एक सेकंदाने ही शर्यत पूर्ण केली.

४०० मीटर धावण्यात आफ्रिकेचा निकेर्क विजेता
बीजिंग : दक्षिण आफ्रिकेच्या वेयदे व्हॅन निकेर्कने रोमहर्षक ठरलेल्या ४०० मीटर शर्यतीत विजेतेपद मिळवले आणि जागतिक मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण ठरलेली ही शर्यत निकेर्कने ४३.४८ सेकंदांत पार केली. अमेरिकेच्या लॉसॉन मेरिटीने (४३.६५ सेकंद) रौप्य तर ग्रेनेडाच्या किगॉनी जेम्सने (४३.७८ सेकंद) कांस्यपदक मिळवले. भालाफेकीत केनियाच्या ज्युलियस येगोने (९२.७२ मीटर) सहज विजेतेपद पटकावले. इहाब सईद (इजिप्त) व तिरो मितकामाकी (फिनलंड) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवले.
महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत चेक प्रजासत्ताकच्या झुजाना हेजनोवाला (५३.५० सेकंद) सुवर्णपदक मिळाले. अमेरिकेच्या शॉमियर लिटिल व कॅसांड्रा टेट यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. पोल व्हॉल्टमध्ये येरेस्ली सिल्वाला (क्युबा)  सुवर्णपदक मिळाले. फॅबिआनो म्युरेर (ब्राझील) व निकोलिता किरिया (ग्रीस) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाचा मान मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 2:53 am

Web Title: tintu lukka qualifies for olympics
Next Stories
1 सिंक्वेफिल्ड बुद्धिबळ स्पर्धा : आनंदची बरोबरी
2 श्रीलंकेचे खेळाडू फिरकीच्या जाळ्यात ;जयसूर्याचे परखड मत
3 द्रविडने आत्मविश्वास दिला -करुण नायर
Just Now!
X