ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेनंतर महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटला अलविदा केला. यामुळे विराट कोहली नियमित कसोटी कर्णधार होईल हे स्पष्ट झाले. मात्र नियमित कर्णधारपदाच्या पहिल्याच मोहिमेतून विराट कोहली माघार घेण्याची शक्यता आहे. दमवणाऱ्या भरगच्च वेळापत्रकामुळे आपल्याला बांगलादेश दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात यावी अशी विनंती कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केली आहे. बीसीसीआयने या विनंतीला होकार दिल्यास बांगलादेश दौऱ्यात भारतीय संघाला हंगामी स्वरूपासाठी नवा कर्णधार शोधावा लागणार आहे.
कोहलीव्यतिरिक्त संघातील अन्य वरिष्ठ खेळाडूही बांगलादेशचा दौरा करण्यास अनुकूल नसल्याचे समजते. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका, चार महिन्यांचा प्रदीर्घ ऑस्ट्रेलियाचा दौरा, दीड महिन्यांची विश्वचषक स्पर्धा आणि त्यानंतर सुरू असलेली आयपीएल स्पर्धा यामुळे सर्वच भारतीय खेळाडू सहा महिन्यांहून अधिक काळ सतत खेळत आहेत. यामुळे आयपीएलनंतर लगेच बांगलादेशचा दौरा करण्यासाठी अनेक खेळाडूंची पसंती नाही. मात्र तूर्तास कोहलीनेच विश्रांतीसाठी परवानगी मागितली आहे. मात्र सर्वच प्रमुख खेळाडूंनी माघार घेतल्यास मालिकेच्या प्रेक्षकसंख्येवर परिणाम होणार असल्याने बीसीसीआय सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकत नाही. कोहलीच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळण्यासाठी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांची नावे चर्चेत आहेत. मात्र या दोघांकडेही वरिष्ठ संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. मात्र रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्याकडे कर्णधारपदाचा अनुभव असल्याने त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.  
दरम्यान विश्वचषकासह मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. मात्र बांगलादेश दौऱ्यासाठी नवीन प्रशिक्षकांची नियुक्ती होणार नसल्याचे समजते. संचालक रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. फ्लेचर वगळता अन्य सहयोगी संघासोबत कायम असतील. भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यात एकमेव कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
२० मे रोजी निवड
बांगलादेशच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड २० मे रोजी होणाऱ्या बैठकीत केली जाणार आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.