विश्वचषक स्पर्धांचा हंगाम संपला आहे. विंडीजचा दौरा सुरु होण्यासाठी अद्याप थोडा कालावधी शिल्लक आहे. या दरम्यान तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेत अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आपली जादुई गोलंदाजी दाखवत आहे. पण या साऱ्यांमध्ये त्याने एक सामन्यात टाकलेल्या अजब गजब चेंडूची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अश्विन हा तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेत दिंडीगुल ड्रॅगन्स या संघाकडून खेळत आहे. नुकत्याच झालेल्या एका सामन्यात अश्विनने एक अजब पद्धतीचा चेंडू टाकला आणि विशेष म्हणजे त्या चेंडूवर त्याला विकेटदेखील मिळाली. सामन्यातील २० वे षटक टाकताना त्याने एक चेंडू पाठीमागे लपवून रन-अप घेतला. त्यामुळे फलंदाजाला चेंडूचा अंदाज आला नाही. त्यानंतर चेंडू टाकल्यावर फलंदाज काहीसा गोंधळला. परिणामी अश्विनला त्या चेंडूवर गडी बाद करता आला. तामिळनाडू प्रीमिअर लीग (TNPL) ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “अश्विनने चेंडूसोबत केलेले प्रयोग”, असे कॅप्शनही दिले आहे.

सध्या सुरु असलेल्या तामिळनाडू प्रीमिअर लीग (TNPL) स्पर्धेत या आधी देखील अश्विनने अशीच अजब पद्धतीची गोलंदाजी केली होती. या आधी अश्विनने डाव्या हाताने गोलंदाजी केली होती आणि फलंदाजाला बुचकळ्यात टाकले होता.